शालेय विद्यार्थी करत आहेत डेंग्यु जनजागृती मनपातर्फे देण्यात आले स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड

शालेय विद्यार्थी करत आहेत डेंग्यु जनजागृती मनपातर्फे देण्यात आले स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड

चंद्रपूर २२ जुलै – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शालेय विद्यार्थ्यांना स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड दिले जात असुन विद्यार्थी पालकांच्या मदतीने घरी उत्पत्ती होऊ शकणाऱ्या डासांना आळा घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

डेंग्यु व इतर कीटकजन्य आजाराचा प्रसार होऊ नये या दृष्टीने ८ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यंत सदर मोहीम राबविण्यात येत असुन ॲक्टिव्हिटी कार्डनुसार यात राबवायची सर्व कार्ये ही पालकांच्या उपस्थितीतच करावयाच्या आहेत. आठवड्यातुन एक दिवस पालकांच्या मदतीने पाणी साठवलेली भांडी तपासणे, कुलर, फ्रिज, फिश पॉट, पाण्याची टाकी तपासणे, डासअळी आढळल्यास पालकांच्या मदतीने भांडे कोरडे करणे व कापडाने पुसुन घेणे इत्यादी कार्यांद्वारे डासोत्पत्ती स्थाने नष्ट केली जात आहेत.

शहरातील १३९ शाळांपैकी ६० शाळांमध्ये ही मोहीम सुरु झाली असुन शहरातील संपुर्ण शाळांचा यात सहभाग असावा या दृष्टीने मनपा आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. ३० सप्टेंबर रोजी मोहीम संपल्यावर शालेय विद्यार्थी आपले स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड वर्गशिक्षक यांच्याकडे जमा करतील, शिक्षकांच्या माध्यमातुन आरोग्य विभागाकडे सदर माहीती जमा करण्यात येईल. यानंतर लकी ड्रॉ द्वारे मनपातर्फे पहिले शाळास्तरावर व नंतर महानगरपालिकास्तरावर बक्षिसे देण्यात येणार आहेत.

डेंग्युसंबंधी आवश्यक ती काळजी सावधगिरी बाळगण्यासाठी स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड मोहीम आपल्या शाळांमध्ये सुरु करण्याचे तसेच शिक्षक पालक बैठकीद्वारे जनजागृती करण्याचे आवाहन आयुक्त राजेश मोहीते यांच्याद्वारे सर्व शाळांना करण्यात येत आहे.