अंमली पदार्थ विक्री, वाहतूक व सेवन करणाऱ्या विरुध्द होणार कारवाई – पोलीस अधीक्षक वसंत जाधव

अंमली पदार्थ विक्री, वाहतूक व सेवन करणाऱ्या विरुध्द होणार कारवाई – पोलीस अधीक्षक वसंत जाधव

Ø  कुरीअर किंवा पोस्टाचे पार्सल व औषधी दुकानांची होणार तपासणी

भंडारादि. 23 : जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, पुरवठा किंवा साठा करणाऱ्यांचा शोध घेण्यात यावा. कुठेही अंमली पदार्थाची विक्री, पुरवठा किंवा साठा निदर्शनास आल्यास संबंधितावर तात्काळ कार्यवाही करुन गुन्हे दाखल करावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी दिल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अंमली पदार्थांचे भंडारा जिल्ह्यातून उच्चाटन करण्यासाठी (दि.22) रोजी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. अभय थूल, जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ. शैलेश कुकडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमोद सोनोने, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रशांत रामटेके, जिल्हा कृषी अधिकारी मिलींद लाड, पोस्ट ऑफिसचे ईश्वर ढेंगे, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार उपस्थित होते.

औषधी दुकानात विक्री करण्यात येणारी कोरेक्स सायरप ही वैद्यकीय अधिकारी यांचे प्रिस्क्रीप्शन शिवाय विक्री करण्यात येते किंवा कसे याबाबत देखरेख करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला यावेळी सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यात अफु, गांजा ची लागवड होत असल्यास कृषी विभागाने त्याची माहिती काढून कारवाई करावी. तसेच बाहेर राज्यातून किंवा विदेशातून येणाऱ्या किंवा जाणाऱ्या पार्सलच्या तपासणी सोबतच पार्सल पाठविणाऱ्या व घेणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्रे तपासावी, अशा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यात चालू किंवा बंद असलेल्या रासायनिक कारखाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. एन. डी. पी. एस. कायद्यामधील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्याकरिता तपास करणारे पोलीस अधिकारी यांच्या करिता प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्याबाबत त्यांनी यावेळी निर्देश दिले.