प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांनी साधला  लाभार्थ्यांशी संवाद

प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

भंडारा, दि. 31 :  भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्या वतीने देशभरात आझादी का अमृत महोत्सवांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज 31 मे 2022 रोजी            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी लाभार्थ्यांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.

जिल्ह्यातील नागरिकांकरीता व योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांसाठी संवाद कार्यक्रमाचे आयोजन आज जिल्हा परिषद सभागृह, भंडारा येथे स्थानिक प्रशासनातर्फे करण्यात आले. संवाद कार्यक्रमाला जि.प सभापती रमेश पारधी, सभापती मदन रामटेके, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अतिरीक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध विभागाकडून नागरिकांकरिता राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना, पुरक पोषण आहार योजना, पोषण व आरोग्य शिक्षण योजना, गरोदर महिलांकरीता लसीकरण योजना, माझीकन्या भाग्यश्री योजना, जल जीवन मिशन योजना, स्वच्छ भारत मिशन योजना, अन्न पुरवठा योजना व आदी योजनांची माहिती कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांना व लाभार्थ्यांना देण्यात आली. यावेळी कार्यक्रमात विविध योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.