समर्पित आयोग शनिवारी
नागरिकांची मते जाणून घेणार
- शुक्रवारपर्यंत नोंदणी करणे आवश्यक
- विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार
भंडारा, दि. 24 : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गात (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग स्थापन केला आहे. समर्पित आयोग शनिवार, दिनांक 28 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे नागरिकांची मते जाणून घेणार आहेत.
ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने शनिवार, दिनांक 28 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत नागरिकांची मते जाणून घेणार आहेत.
या समर्पित आयोगाच्या भेटीच्यावेळी नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी शुक्रवार, दिनांक 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करावी. तसेच यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या सहाय्यता कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) डॉ. सचिन पानझाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9561192649, 7020301525 व 9970839289 तसेच ई-मेल dyceogzpbhandara@gmail.com, rdcbhandara4@gmail.com असा आहे.