नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित
- जिल्हाधिकारी कार्यालयात 27 मे रोजी नोंदणी करावी
भंडारा, दि. 20 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांची निवेदने स्विकारण्यासाठी समर्पित आयोगाने नागपूर विभागासाठी 28 मे, 2022 रोजी सायंकाळी 4.30 ते 6.30 पर्यंत भेटीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधाने समर्पित आयोगास भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी किंवा संस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे स्थापन करण्यात आलेल्या सहाय्यता कक्षामध्ये नागपूर विभागासाठी 27 मे, 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत व्यक्तीचे किंवा स्थंस्थेचे नाव, पत्ता, दुरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी इत्यादी मजकुर स्पष्टपणे नोंदवून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे स्थापन करण्यात आलेल्या सहाय्यता कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 9822277136 व 9970839289 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.