लोककलांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर मोहिमेचा प्रसिध्दी अहवाल पालकमंत्र्यांना सादर

लोककलांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर

मोहिमेचा प्रसिध्दी अहवाल पालकमंत्र्यांना सादर

भंडारा, दि. 25 : महाविकास आघाडी शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी 9 ते 17 मार्च 2022 या कालावधीत लोककलांच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण 63 गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा प्रसिध्दी अहवाल जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांना जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे यांनी विश्रामगृह भंडारा येथे सादर केला.

जिल्ह्यातील सातही तालुक्यात बाजारपेठेच्या गावी शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला देण्यासाठी लोककला आणि पथनाट्यांचा वापर प्रभावी ठरत असल्यामुळे  शासनमान्य यादीवरील तीन कलापथक संस्थाच्या माध्यमातून शासनाच्या शिवभोजन थाळी, ग्रामविकास, कृषी, स्वच्छ भारत अभियान, महाआवास, आदिवासी खावटी अनुदान योजना यासह विविध योजनांची कलापथकांद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी आमदार अभिजीत वंजारी, आमदार राजू कारेमोरे यांना देखील प्रसिध्दी अहवाल सादर करण्यात आला.