इरई नदीचे खोलीकरण आणि स्वच्छतेमुळे पुराचा धोका टळणार  – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø पडोली येथे गाळ उपसा कामाचा शुभारंभ

इरई नदीचे खोलीकरण आणि स्वच्छतेमुळे पुराचा धोका टळणार  – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø पडोली येथे गाळ उपसा कामाचा शुभारंभ

चंद्रपूर दि. 4 एप्रिल : इरई नदी ही 8 ते 10 किलोमीटर शहराला समांतर वाहते. गत काही वर्षांपासून या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तसेच वाढलेली झुडपे आणि अस्वच्छतेमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबला आहे. परिणामी पावसाळ्याच्या दिवसांत शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे इरई नदीचे खोलीकरण, पूर संरक्षणात्मक कामे आणि नदीच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली असून त्यामुळे पुराचा धोका टळणार व नागरिकांना दिलासा मिळेल, असे मत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

इरई नदी गाळ उपसा व स्वच्छता कार्यक्रमाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामसुंदर काळे, एस. एस. दाणी, प्रकाश देवतळे, शिवानी वड़ेट्टीवार आदी उपस्थित होते.

वर्धा नदिला पूर आला की इरई नदीच्या बैकवॉटरमुळे शहराला पूराचा धोका संभावतो असे सांगून पालकमंत्री श्री. वड़ेट्टीवार म्हणाले, या नदीच्या खोलिकरणाची आणि स्वच्छतेची लोकांची मागणी होती. त्यामुळे खोलिकरणाच्या कामाचा शुभारंभ हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. शासनाने या कामाला मंजूरी दिली असून राज्य सरकारच्या निधीसोबतच आपत्ती व्यवस्थापन मधून 50 कोटी दिले जाईल.

तसेच सर्व्हेच्या माध्यमातून कमी वेळात किती गाळ काढायचा आहे, ते या पहिल्या टप्प्यात लक्षात येईल. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात नदीच्या दोन्ही काठांचे सौंदर्यीकरण, गँबियन बंधारे बांधण्याचे नियोजन आहे. शहराचा 1/3 भाग इरई नदीच्या “ब्लू लाइन” मध्ये येतो. त्यामुळे उथळ झालेल्या या नदीचे खोलिकरण आवश्यक होते. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने हे काम सुरू केले असून खोलिकरण व स्वच्छतेमुळे भविष्यात पूराचा धोका राहणार नाही, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

नदीतून काढलेला गाळ शेतीच्या उपयोगी पडतो. ज्या शेतकऱ्यांना हा गाळ शेतीसाठी न्यायचा असेल त्यांना जलसंपदा विभागाने हा गाळ मोफत उपलब्ध करून द्यावा, अशाही सूचना पालकमंत्र्यांनी जलसंपदा आणि महसूल विभागाला दिल्या.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, चंद्रपूर शहरासाठी इरई नदी वरदानच आहे. गत काही वर्षात गाळ उपसा न झाल्यामुळे पूराचा धोका संभावतो. त्यामुळे पूर प्रतिबंध उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या कामाला सुरवात करण्यात आली आहे. ठराविक वेळेत जलसंपदा विभागाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

प्रस्ताविकातून कार्यकारी अभियंता श्री. काळे यांनी सांगितले की, यांत्रिकी आणि स्थापत्य विभागाच्या समन्वयाने हे काम होणार आहे. पडोली ते चौराह पूल या 7.5 किमी च्या टप्प्यात गाळ काढणे व खोलिकरणाचे काम सुरू करण्यात येत आहे. यातून अंदाजे 5 लक्ष क्यूबिक मीटर गाळ निघणार असून त्यासाठी सहा कोटी रुपये खर्च येणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते मशीनची पूजा आणि कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला