महत्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीत चंद्रपूर जिल्हा अव्वल Ø विभागीय महसूल परिषदेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने सन्मानित

महत्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीत चंद्रपूर जिल्हा अव्वल

Ø विभागीय महसूल परिषदेत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने सन्मानित

चंद्रपूर दि.27 मार्च : महसूल विभागाशी निगडीत सामान्य जनतेचे प्रश्न त्वरीत सोडवून नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने नागपूर येथे दोन दिवसीय महसूल परिषद नुकतीच पार पडली. यात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या नेतृत्वात महसूल विभागातील महत्त्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे चंद्रपूर जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना महसूल परिषदेमध्ये मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

वनामती, नागपूर येथे आयोजित या कार्यक्रमाला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने (चंद्रपूर), आर. विमला (नागपूर), प्रेरणा देशभ्रतार (वर्धा), संदीप कदम (भंडारा), संजय मीना (गडचिरोली), नयना गुंडे (गोंदिया) उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी ‘जमीन विषयक कायद्यातील तरतुदी व सुधारणा’ तसेच ‘अर्ध न्यायीक कामकाज’ याबाबत दोन सत्रात महसूल यंत्रणेला मार्गदर्शन केले. जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यात महत्वाचे फलनिश्चिती क्षेत्र जसे ऑनलाईन सातबारा, ई – फेरफार, शासकीय महसूल वसुली, सातबारा वाटप, प्रलंबित लेखा परिच्छेद निकाली काढणे, अर्धन्यायिक प्रकरणे निकाली काढणे याबाबत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी दूर दृश्य प्रणालीद्वारे संवाद साधताना डॉ. करीर म्हणाले, महसूल विभाग अधिक गतिमान करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करत असतानाच महसूल विभागाशी संबंधित सर्व नियम व कायद्यांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून प्रशासकीय निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विविध कायदे व नियमांची अंमलबजावणी करताना सर्वांना समान न्याय देण्याचे तत्व पाळणे अपेक्षित असल्याचे सांगताना माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर म्हणाले की, कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठी महसूल अधिकाऱ्यांना नियमांचे सखोल ज्ञान आवश्यक आहे. निर्णय घेताना कायद्याच्या कसोटीवर असावेत. महसूल परिषदेसारख्या उपक्रमांतून कायदे व नियमांची माहिती सुलभपणे उपलब्ध होत असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शकपणे करणे शक्य होते. असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे म्हणाल्या, महसूल अधिकाऱ्यांनी अर्ध न्यायिक अथवा इतर कोणतेही प्रशासकीय काम करताना प्रामाणिक हेतूने निर्णय घ्यावेत. तसेच कायदे, नियमांमध्ये होणारे बदल समजून घेवून प्रशासकीय कामकाज करणे गरजेचे आहे. त्यामुळे या कायद्यांची गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी होण्यास मदत होईल.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासह विभागातील इतरही जिल्हाधिका-यांनी वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण केले. यात जिल्हाधिकारी आर. विमला (नागपूर) यांनी वित्तीय व आस्थापना विषयक बाबी, प्रेरणा देशभ्रतार (वर्धा) यांनी अधिकार अभिलेख संगणकीकरण, संदीप कदम (भंडारा) यांनी भुसंपादनाची प्रक्रिया व मुल्यांकन, संजय मीना (गडचिरोली) यांनी दंडाधिकारीय कामकाज तर नयना गुंडे (गोंदिया) यांनी गौणखनीज संदर्भात सुधारणा व तरतुदी याबाबत मार्गदर्शन केले.

महसूल प्रशासनातील उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या संवर्गातील अधिकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महसूल उपायुक्त मिलिंदकुमार साळवे यांनी, तर संचालन आशा पठाण यांनी केले. या परिषदेत नागपूर विभागातील महसूल अधिकारी उपस्थित होते.