गरजू आणि गरिबांना केवळ ५०० रुपयात एलपीजी शवदाहिनी मनपाच्या स्थायी समितीचा निर्णय । बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी

गरजू आणि गरिबांना केवळ ५०० रुपयात एलपीजी शवदाहिनी

मनपाच्या स्थायी समितीचा निर्णय । बाबुपेठ येथील स्मशानभूमीत प्रदूषणमुक्तीसाठी एलपीजी शवदाहिनी

चंद्रपूर । पारंपारिक पद्धतीने लाकडाद्वारे करण्यात येणाऱ्या शवदहनामुळे वातावरणात प्रदूषणात भर पडते. त्याला आळा घालण्यासाठी बायपास मार्गावरील प्रभागात बाबुपेठ स्मशानभूमी येथे एलपीजी गॅसवर चालणारी शवदाहिनी उभारण्यात आली आहे. या शवदाहिनीसाठी २५०० रुपये शुक्ल आहे. मात्र, गरजू आणि गरिबांनी त्यांच्या प्रभागातील नगरसेवकाचे प्रमाणपत्र सादर केल्यास  ५०० रुपये शुक्ल आकारण्याचा निर्णय मनपाच्या स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी घेतला.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात ४ मार्च रोजी आयोजित स्थायी समिती सभेत अध्यक्षस्थानी सभापती संदीप आवारी होते. यावेळी उपायुक्त अशोक गराटे उपस्थित होते. समिती सदस्यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग  घेतला.

शवदहनासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा लागतो. त्यासाठी जंगलतोड होत असते. शिवाय लाकडाद्वारे करण्यात येणाऱ्या शवदहनामुळे वातावरणात प्रदूषण होते. एलपीजी गॅसच्या शवदहनातून वातावरणात प्रदूषण कमी होते. एलपीजी गॅसवरील शवदाहिनीमुळे कार्बनचे प्रमाण कमी होऊन झाडे ही कापण्यापासून वाचतील. त्यासाठी बाबुपेठ प्रभागातील या स्मशानभूमीत ही शवदाहिनी लावण्यात आली. या शवदाहिनीसाठी २५०० रुपये सेवाशुक्ल आकारण्यात येतो. चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून शवदाहिनीची देखभाल दुरुस्त खर्च, एलपीजी सिलेंडर खर्च, वीज खर्च, मजूर खर्च आदीचा खर्च केला जातो. मनपा हद्दीतील नागरिकांना सेवा देण्याच्या दृष्टीने माफक शुक्ल निश्चित करण्यात आला आहे. त्यातही गरजू आणि गरिबांना केवळ ५०० रुपयात एलपीजी शवदाहिनी उपलब्ध करून देण्याचा ठराव स्थायी समितीने घेतला आहे. मात्र, त्यासाठी नागरिकाना प्रभागातील नगरसेवकाचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक राहील, अशी माहिती सभापती संदीप आवारी यांनी दिली.