मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायकल रॅली Ø नवमतदारांनी नाव नोंदविण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सायकल रॅली

Ø नवमतदारांनी नाव नोंदविण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 21  नोव्हेंबर :  भारतीय निवडणूक आयोगाद्वारे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण होत असलेल्या नवमतदारांची नावे, स्थलांतरीत नागरिकांची नावे यादीत समाविष्ट करणे, मृतकांची नावे वगळणे किंवा यादीत काही चुका असेल तर त्याची दुरुस्ती करणे, याचा समावेश आहे. या बाबींची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या नेतृत्वात शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.

सदर रॅली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून सुरू होवून जटपुरा गेट- गिरणार चौक- गांधी चौक- जटपुरा गेट- डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय- वरोरा नाका- सिद्धार्थ हॉटेल समोरून परत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सांगता झाली.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री गुल्हाने म्हणाले, भारतीय संविधानाने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे. आणि हा हक्क जास्तीत जास्त लोकांनी बजावावा म्हणून निवडणूक आयोगाद्वारे मतदार याद्यांचे पुनरीक्षण करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील ज्या व्यक्ति 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करतील, त्यांनी आपली नावे आवर्जून मतदार यादीत नोंदवावी. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्ह्यात होऊ घातल्या आहेत. त्यासाठी ही यादी वापरली जाणार आहे. त्यामुळे कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी आपापली नावे त्वरीत नोंदवावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

सदर रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांच्यासह महानगरपालिकेचे उपायुक्त, औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, इंडियन मेडिकल असोसिएशन, विद्यार्थी व नागरिक यांचा सहभाग होता.