मतदार यादीतील दुरुस्ती ३० नोव्हेंबरपर्यंत करा – मनपाचे उपायुक्त अशोक गराटे यांचे आवाहन

मतदार यादीतील दुरुस्ती ३० नोव्हेंबरपर्यंत करा – मनपाचे उपायुक्त अशोक गराटे यांचे आवाहन

चंद्रपूर, ता. १७ : निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत छायाचित्रासह मतदार नोंदणी, मतदारयाद्यांचे शुध्दीकरण आणि सुसूत्रीकरण, दावे व हरकती स्वीकारणे, सुधारित अंतिम यादी प्रसिध्द करणे ही कामे ३० नोव्हेंबरपर्यंत केल्या जाणार आहेत. त्यानुसार १८ वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येकाने मतदार यादीत आपली नोंदणी करुन निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे. सुदृढ राष्ट्रनिर्मितीसाठी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून आपले कर्तव्य निभवावे, असे आवाहन मनपाचे उपायुक्त अशोक गराटे आज येथे केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल, सहायक आयुक्त विद्या पाटील यांची उपस्थिती होती. भारत निवडणूक आयोगाकडून 1 जानेवारी, 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या युवक व युवतींनी मतदार म्हणून मतदार यादीत नोंद करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.

यावेळी उपायुक्त अशोक गराटे यांनी सांगिलते की, मतदानाविषयी जनजागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी, प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजाविता यावा तसेच अगदी सहजरित्या मतदार नोंदणी करता यावी यासाठी निवडणूक आयोगाव्दारे ‘वोटर हेल्पलाईन ॲप’ विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना मतदार नोंदणी व अनुषंगिक कामे करता येईल तसेच 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांना सुध्दा मतदार नोंदणी करता येईल. निवडणूक विभागाकडून उपलब्ध होणाऱ्या अर्ज क्र. 6, 6-अ, 7, 8 व 8-अ च्या अर्जाव्दारे नागरिकांना मतदान नोंदणी संबंधिचे कामे पूर्ण करता येईल. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर हजर राहून पात्र व्यक्तींचे मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारतील. नागरिकांनी आवश्यक नमुन्यात अर्ज दाखल करून नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादी संदर्भात इतर कामे करून घ्यावीत. येत्या २७ व २८ नोव्हेंबर रोजी विशेष कार्यक्रम होणार असून, दि. 1 ते 20 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, दि. 5 जानेवारी 2022 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी देण्यात येईल.