पारंपरिक शेतीला पुरक व्यवसाय व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
Ø ब्रह्मपुरी, सावली व सिंदेवाही तालुका सिंचनाच्या क्षेत्रात अग्रेसर करणार
चंद्रपूर दि.31 ऑक्टोबर: शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठातील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे. विभागिय कृषी संशोधन केंद्रातील उपलब्ध तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा अवलंब करत शेतीचा विकास साधावा, तसेच पारंपारिक शेतीला पूरक व्यवसाय व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. विभागीय कृषि संशोधन केंद्र, सिंदेवाही येथे आयोजित धान महोत्सव, शेतकरी मेळावा, कृषि प्रदर्शनी व चर्चासत्र कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले, नगराध्यक्ष आशाताई गंडाटे, सभापती मंदाताई बाळबुद्धे, विजय कोरेवार, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे, विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. अनिल कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कार्यक्रम समन्वयक डॉ. विनोद नागदेवते, प्राध्यापिका स्नेहा वेलादी प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतीतही आता डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, कृषी केंद्रातून अनेक प्रजातीचे धानाचे संशोधन झाले आहे. त्यासाठी कृषी संशोधन केंद्र सातत्याने कार्य करीत आहे. शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असून त्याची ओळख पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून होत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या मदतीने छोटे छोटे देश शेती व्यवसायात अग्रगण्य स्थानावर पोहोचले आहे. विदेशात 500 एकरसाठी फक्त 20 लोकांची आवश्यकता असते ऐवढे तंत्रज्ञान या देशांनी विकसित केले आहे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करत नवनवीन तंत्रज्ञानाचा व यंत्राचा वापर करावा व दर्जेदार व शाश्वत शेतीकडे वळावे.
ओळख