नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सुरू

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सुरू

भंडारा,दि.29: राज्यात कोविड 19 मुळे निर्माण झालेली परिस्थिती व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद करण्यात आलेले होते. 26 ते 30 जून 2021 पर्यंत ऑफलाईनव्दारे व रस्त्यांची स्थिती पाहून पर्यटन सुरु करण्यात आलेले होते. मात्र दिनांक 1 जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत दरवर्षी प्रमाणे अंतर्गत व्यवस्थापनाच्या दृष्टीने नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन बंद ठेवण्यात आलेले होते. नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 1 ऑक्टोबर 2021 पासून वाहन क्षमतेच्या मर्यादेत पर्यटनाकरिता ऑनलाईनव्दारे व सफारीचा कोटा शिल्लक असल्यास ऑफलाईनव्दारे सुरु करण्यात येत आहे. असे नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक यांनी कळविले आहे.

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचे ऑनलाईन सफारी आरक्षण व निवास व्यवस्था www.mahaecotourism.gov.in या संकेतस्थळावरुन सुरु करण्यात आलेली आहे. कोरोना व्हायरस (कोविड-19) संदर्भात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, राज्य शासन, स्थानिक जिल्हा प्रशासन यांचेव्दारे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांचे पालन करणे पर्यटकांना अनिवार्य राहील. कोविड -19 संसर्गाची भविष्यात उद्भवणारी परिस्थिती व निर्बंध लक्षात घेवून तसेच पर्यटन रस्त्यांची स्थिती लक्षात घेऊन पर्यटनाचे नियमन अथवा निर्बंध लावण्याचे अधिकार वन्यजीव विभाग राखून ठेवत आहे.