25 सप्टेंबर रोजी माहिती विभागाच्यावतीने प्रशिक्षणसत्राचे आयोजन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन  

राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहानिमित्त

25 सप्टेंबर रोजी माहिती विभागाच्यावतीने प्रशिक्षणसत्राचे आयोजन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

  मुंबई दि. 24 : राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरुकता सप्ताहानिमित्त मुंबईस्थित ‘आय केअर’ या स्वयंसेवी संस्था आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अकस्मात हृदयरोग जागरुकता यासंदर्भात 25 सप्टेंबर (शनिवार) रोजी सकाळी 10.30 वा. दूरदृश्य माध्यमाद्वारे अकस्मात हृदयरोग या विषयावर प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणसत्राचे उद्घाटन  माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे.

 

            यावेळी माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टेसंचालक गणेश रामदासीसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महासंचालनालयाचे संपूर्ण मनुष्यबळ व राज्यभरातील पत्रकार सहभागी होणार आहेत.

            या प्रशिक्षणानंतर आय केअरचे डॉ. यश लोखंडवाला (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ.ब्रायन पिंटो (कार्डियोलॉजिस्ट), डॉ.किंजल गोयल (मानसोपचारतज्ज्ञ) हे यावेळी अकस्मात हृदयरोग या विषयावर मार्गदर्शन करतील व सहभांगीच्या प्रश्नांना उत्तरेही देतील.

            आकस्मित हृदयरोगाच्या झटक्याने होणारा मृत्यु ही आता नेहमीचीच बाब झाली आहे. मात्र हृदयविकाराचा झटका आल्यावर तातडीने उपाययोजना केल्यास मृत्यु टाळता येऊ शकतो. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहा निमित्त या प्रशिक्षणसत्राचे आयोजन करण्यात आले असून या ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ सर्वांनाच होणार आहे. या कार्यक्रमात दूरदृश्य माध्यमाद्वारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकारी आणि त्या-त्या जिल्ह्यातील  माध्यम प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तसेच तो महासंचालनालय व अधिनस्त कार्यालयांच्या ट्विटर हँडलवर सर्व जनतेस लाईव्ह पाहता येणार आहे.

            अचानक हृदयविकाराचा झटका येणाऱ्या पीडीतांना वैद्यकियदृष्ट्या मेंदू मृत होण्यापासून बचाव करण्यासाठी योग्यवेळी सीपीआर  (कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन) म्हणजेच हाताने हृदयदाब व तोंडाने श्वासोच्छवास देणे शक्य तितक्या लवकर सुरू करणे गरजेचे आहे. याबाबतची अधिक माहिती या सप्ताहात नागरिकांना दिली जाणार आहे. याचबरोबर सीपीआर आणि एईडी मशीनचा वापर करण्याचेही प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणेकरून आपल्या जवळची व्यक्ती किंवा नातेवाईकाचे प्राण वाचविण्यास सहकार्य करता येणार आहे. या प्रशिक्षण सत्राचे थेट प्रसारण मा.व.ज. च्या ट्विटर हँडलवर MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR): https://twitter.com/MahaDGIPR याद्वारे पाहता येईल. राज्यातील सर्व माध्यमकर्मी यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.