छोटे- मोठ्या उद्योजकांना पटवून दिले स्वच्छतेचे महत्व

छोटे- मोठ्या उद्योजकांना पटवून दिले स्वच्छतेचे महत्व

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे जनजागृती मोहीम

चंद्रपूर, ता. १२ : चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे “स्वच्छ निळ्या आकाशासाठी; स्वच्छ हवा” आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस या उपक्रमाअंतर्गत दे. गो. तुकूम परिसरातील काम करणारे छोटे – मोठे उद्योजक यांच्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेअंतर्गत सफाई कामगारांना नागरिकांकडून कचरा घेताना ओला व सुका कचरा वेगळा घेणे, त्यातही प्लास्टिकचा कचरा वेगळा करणे आदींचे महत्व पटवून देण्यात आले.
शहरात ठिकठिकाणी असणारे छोटे मोठे उद्योग चालविणारे उद्योजक यांना त्यांच्या दुकानातून निघणारा कचरा परिसरात इतरत्र फेकू नये किंवा तो कचरा परिसरात जाळू नये अशा सूचना देण्यात आल्या. परिसरात कचरा जाळल्यास कचऱ्यातून काळा धूर निघतो, तो हवेत मिसळतो. सोबतच आजच्या कचऱ्यात जास्तीत जास्त प्लास्टिक असतात ते अर्धवट जळतात, जळाले तरी त्यातून विविध विषारी रासायनिक पदार्थांचा धूर हवेत मिसळतो, ज्यामुळे वायुप्रदूषण होऊन आपल्याला श्वसनाचे व दम्याचे विकार उद्भवतात. त्यामुळे आपल्या दुकानात जमा होणारा कचरा दुकानासमोर येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याजवळच द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
स्थानिक परिसरात इतरत्रही दिसणारा कचरा वेळीच गोळा करणे, कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी डम्पिंग यार्डमध्येच कचरा जमा करणे याबद्दल सूचना देऊन जनजागृती करण्या आली. सर्व उद्योजकांनी सर्व सूचनांचे पालन करून सहकार्य देण्याचे आश्वासन देऊन चंद्रपूर शहर प्रदूषणमुक्त कसे ठेवता येईल, यासाठी एकजुटीने व सचोटीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.