जादा दराने युरीया खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई

जादा दराने युरीया खत विक्री

करणाऱ्या कृषी केंद्रावर कारवाई

  • खत परवाना निलंबीत

भंडारा,दि.2:- तुमसर तालुक्यातील एक शेतकरी मेसर्स पोपटानी एजन्सी तुमसर येथे युरीया खत खरेदीसाठी गेला परंतू विक्रेता युरीयाचे बॅगची वाढीव किंमत व त्यासोबत लिकींग घेतल्याशिवाय युरीया मिळणार नाही असे सांगत होता. त्यावेळी शेतकऱ्याला युरीयाची खूप आवश्यकता असल्यामुळे त्यांनी जादा दराने युरीया खरेदी केला. परंतू नंतर कृषी विक्रेत्यावर कारवाई होणेसाठी शेतकऱ्याने चक्क त्या दुकानात जावून व्हिडीओ तयार केला व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा यांना पाठविला व ही धक्कादायक बाब उघडकीस आली. विक्रेत्याने जाणीव पुर्वक युरीया खतीची जादा दराने विक्री करण्याचे व त्यासोबत लिकींग करण्याचे प्रयोजन ठेवून खताचा काळाबाजार करण्याचे उद्देशाने शेतकऱ्याला युरीया खताचे वाढीव दर सांगितलेले आहे. विक्रेता हा युरीया खताची विक्री जादा दराने करून त्यासोबत लिकींग करून खत विक्री करीत असल्याचे उघडकीस आलेले आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोपटानी एजन्सी तुमसर यांचा परवाना पुढील आदेश होईपर्यंत निलंबीत करण्यात आलेला असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी कळविले आहे.
या व्हिडीओ मध्ये विक्रेता प्रतिनिधी व शेतकरी यांचे झालेले संभाषण रेकार्ड झालेले असून मेसर्स पोपटानी एजन्सी तुमसर हा खत विक्रेता युरीयाची प्रती बॅग 300 रुपये व त्या सोबत लिकींग मटेरियल 100 रुपये असे एकुण 400 रूपयाची मागणी करीत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. या व्हीडीओ मध्ये शेतकऱ्याने फक्त युरीयाची मागणी केली असता विक्रेत्यानी त्याला लिकींग मटेरियल घेतल्याशिवाय युरीया मिळणार नाही असे म्हटलेले आहे. परंतू खताची विक्री करतांना आधार कार्डची मागणी करून खत पॉस मशिनव्दारे विक्री करणे हे विक्रेत्यास बंधनकारक असतांना तसा कोणताही उल्लेख व्हिडीओ मध्ये आलेला नाही.
 जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना युरीया खत किंवा कोणतेही रासायनिक खत खरेदी करीत असतांना कोणताही खत विक्रेता जादा दराने विक्री किंवा लिकींग बाबत सक्ती करीत असेल तर याची तात्काळ माहिती जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा, कृषि विकास अधिकारी जिल्हा परीषद भंडारा, संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी किंवा सबंधीत तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात यावी. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रदीप म्हसकर (9022541652), मोहीम अधिकारी जिल्हा परिषद विकास चौधरी (9637661587), उपविभागीय कृषि अधिकारी भंडारा मिलींद लाड (9890460234), उपविभागीय कृषि अधिकारी साकोली पी.पी.गिदमारे (9405987250 ) यांचेशी संपर्क साधावा, असे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे .
जिल्ह्यात सर्व प्रकारची रासायनिक खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून योग्य त्या प्रमाणात खत पुरवठा होत आहे. खत विक्रेत्यांनी कोणत्याही खताची किंबहुना युरीया या खताची जास्त दराने विक्री करू नये किंवा त्यासोबत कोणतेही खत लिकींग करू नये अशा सूचना विक्रेत्यांना दिलेल्या आहेत तरीही युरीया खताची जादा दराने विक्री किंवा युरीया खतासोबत लिकींग करणेची बाब अत्यंत गंभीर असून असे प्रकार करणाऱ्या जिल्ह्यातील कोणत्याही कृषि विक्रेत्याची गय केली जाणार नाही. त्यांचेवर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भंडारा हिंदुराव चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.