चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलचे पट्टे वाटप करणार  – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलचे पट्टे वाटप करणार  – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

Ø 13झोपडपट्टीचे नकाशे मंजूरीकरीता तात्काळ पाठविण्याचे निर्देश

Ø झोपडपट्टीधारकांना मिळणार दिलासा

चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट : चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात शासकीय जमिनीवर एकूण 14 झोपडपट्टया आहेत. यापैकी बाबानगर येथील झोपडपट्टीला नगर रचनाकार यांनी मान्यता दिली आहे. उर्वरीत 13 झोपडपट्टीचे नकाशे मंजूरीकरीता सहसंचालक नागपूर यांना तात्काळ पाठवावे. जेणेकरून शहरातील झोपडपट्टीवासियांना नझुलचे पट्टे वाटप करणे सोयीचे होईल व नागरिकांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झोपडपट्टीधारकांच्या नझुल पट्टे वाटपासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन लोंढे, नगर रचनाकार आशिष मोरे आदी उपस्थित होते.

शहरातील झोपडपट्टीधारकांना नझूलपट्टे वाटपाबाबत नागपूरच्या धर्तीवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वस्त करून पालकमंत्री म्हणाले, सर्व झोपडपट्ट्यांचा त्वरीत सर्व्हे करा. त्यांचे नकाशे मंजूरीकरीता नागपूर येथील सहसंचालक कार्यालयाला त्वरीत पाठवा.

शहरातील 14 झोपडपट्ट्यांमध्ये एकूण 4815 कुटुंबांचे वास्तव्य आहे. 17 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभ मिळण्यास पात्र असलेल्या कुटुंबांची संख्या 380 आहे.  झोपडपट्टी अभिन्यासामध्ये आवश्यक ती खुली जागा तसेच विकास नियंत्रण नियमावलीनुसार आवश्यक रुंदीचे रस्ते प्रस्तावित करण्यास मंजूरी प्रदान करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच शिथिलीकरण प्रस्तावात खुली जागा, रस्त्यांची रुंदी, त्यांचे मोजमाप, रस्त्याचे रुंदीकरण, प्रत्येक भुखंडास पोचमार्ग आदी त्रृट्यांची पुर्तता करून सुधारितरित्या प्रस्ताव पाठविण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार नगर रचना कार्यालयाकडून कारवाई सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.