नोंदणी केली नसल्यास मूर्तिकारांवर दंडात्मक कार्यवाही

नोंदणी केली नसल्यास मूर्तिकारांवर दंडात्मक कार्यवाही

चंद्रपूर, ता. २७ : गणेशोत्सवात मातीच्या मूर्ती विक्री करणाऱ्या मूर्तीकारांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडे नोंदणी कराव्यात, अशा सूचना मागील १५ दिवसापूर्वी देण्यात आल्या होत्या. तरीही चंद्रपूर शहरामध्ये अनेक मूर्तिकारांनी महानगरपालिकेकडे नोंदणी न करता मूर्ती विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे आढळून येत आहे. मनपाच्या पथकाद्वारे तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असून, नोंदणी आढळून न आल्यास मूर्तिकारांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मूर्ती विक्री करणाऱ्या सर्व मूर्तिकारांची नोंदणी करण्यात येत आहे. नोंदणीसाठी झोननिहाय मुख्य स्वच्छता निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मूर्ती विक्रीच्या ठिकाणी नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. मात्र, नोंदणी न करता काहीजण मूर्ती विकताना दिसत आहेत. अशांवर सक्त कारवाई सुरु करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने श्रीगणेशाच्या पीओपी मूर्तींवर बंदी जाहीर केलेली आहे. त्यानुसार चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी कडक अंमलबजावणी होणार आहे. गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड, दुकाने सील, डिपॉझिट जप्त आणि दोन वर्षे बंदीसह प्रदूषण नियंत्रण कायद्यानुसार फौजदारी कारवाई केली जाणार आहे.
———-