पेंढरी-मोठी येथे एकाच दिवशी विक्रमी लसीकरण कोविड लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेंढरी-मोठी येथे एकाच दिवशी विक्रमी लसीकरण

कोविड लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भंडारा, दि.24:- लाखनी तालुक्यातील मौजा पेंढरी-मोठी येथे 23 ऑगस्ट 2021 ला घेण्यात आलेल्या कोविड लसीकरणाला गावातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लसीकरणाची नोंद पेंढरी या लहानशा गावाने गाठलेली दिसून आली. याकरीता जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गावाचे अभिनंदन केले.

सदर दिवशी 518 लसीकरणाची नोंद झाली. लसीकरणासाठी ग्रामपंचायत कार्यालय, आशा सेविका, गावातील शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका व विविध प्रकारच्या सामाजिक संघटनांनी जनजागृती केली. पेंढरी गावात 750 पेक्षा जास्त व्यक्तींना लसीचा पहिला डोस देणे शिल्लक होते. मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, सर्व ग्रा.पं.सदस्य, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रा.पं.कर्मचारी, पोलीस पाटील, रेशन दुकानदार, तंटामुक्त समिती सदस्य, उमेद महिला बचतगटाचे सदस्य व सन्माननीय नागरिक यांची बैठक आदल्या दिवशी घेऊन ग्रा.पं.ने केलेले योग्य नियोजन, प्रत्येक कुटुंबांच्या घरी आदल्या दिवशी दिलेली वैयक्तिक भेट, ग्रुप ने केलेले काम ,डाटा एन्ट्री करण्यासाठी 6 व्यक्ती, प्रत्यक्ष लस देण्यासाठी 2 वैद्यकीय अधिकारी, सिस्टर, 10 व्यक्तींचा मदतनीस चमू, लसीकरणासाठी टोकन सिस्टीम, आदल्या दिवशी दिलेली मुनादी, स्वतंत्र वाहनाद्वारा केलेली प्रचार – प्रसिद्धी व लसीकरणाच्या दिवशी शेतीकामास ग्रामस्थांची ऐच्छिक सुट्टी तसेच तालुका स्तरावरून नरेश नवखरे (तालुका समन्वयक,तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष) यांनी पार पडलेली विशेष जबाबदारी यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण होऊ शकले.

झालेल्या लसीकरणाला तहसिलदार लाखनी श्रीमती दोनोडे, गटविकास अधिकारी पं.स लाखनी डॉ. शेखर जाधव तालुका आपत्ती समन्वयक नरेश नवखरे, सीएचओ कनेरी एस.एम.मडामे, विजु बाभरे, ए.आर.खराबे, कनेरी ग्रामसेवक एच.बी कावळे, सरपंच राजेंद्र कुनभरे, उपसरपंच घनश्याम काळे यांचे मार्गदर्शनात लसीकरण मोहीम यशस्वी होणेकरीता गावातील नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. सदर लसीकरण उपक्रम यशस्वी करणेकरीता गावातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, पोलीस पाटील, उमेद प्रभाग समन्वयक श्री. भैसारे, उमेद महिला बचत गट व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सदर लसीकरणाकरिता सहकार्य केले.