पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना Ø अनु.जमाती प्रवर्गातील इच्छुक शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना

Ø अनु.जमाती प्रवर्गातील इच्छुक शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 23 ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यात मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांची व्यवसायिक पद्धतीने लागवड करून उत्पादन घेतले जाते. तसेच त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मागील 2 ते 3 वर्षापासून भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला बियाणांच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने नियंत्रित वातावरणामध्ये तयार झालेली कीड रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार कीड रोगमुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यास वाव आहे. याच उद्देशाने शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका  योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे.

भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीड रोगमुक्त रोपे निर्मिती करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे, पीक रचनेत बदल घडवून आणणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

राज्यातील सर्व तालुक्यात रोपवाटिका स्थापन करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारण्याचे प्रस्तावित असून प्रत्येक तालुक्यांनी प्रवर्गनिहाय खातेदारांची संख्या लक्षात घेऊन वाटप करावयाचे आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका उभारणी करणे बंधनकारक असल्यामुळे किमान एक लक्षांक प्रत्येक तालुक्यास देण्यात येत आहे.

लाभार्थी निवडीमध्ये अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान 0.40 हेक्टर जमीन तसेच जमिनीचा सातबारा असणे आवश्यक आहे. रोपवाटिका उभारणीसाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे. तसेच  लाभार्थी  निवडीच्या प्राधान्यक्रमामध्ये महिला कृषी  पदवीधारकांना प्रथम प्राधान्य, महिला गट व महिला शेतकरी यांना द्वितीय प्राधान्य तर भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य देण्यात येईल.

या योजनेअंतर्गत रोपवाटिका पूर्णपणे नव्याने उभारावयाची आहे. या घटकांतर्गत यापूर्वी शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेले खाजगी रोपवाटिकाधारक, शासनाचा लाभ न घेता उभारलेल्या खाजगी रोपवाटिकाधारक तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन अभियान, पोकरा किंवा इतर योजनेतून संरक्षित शेती (शेडनेट व हरितगृह) या घटकाचा लाभ घेतलेले लाभार्थी पुनश्च: सदर योजनेअंतर्गत लाभास पात्र राहणार नाहीत.

रोपवाटीका योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावर ऑनलाईन किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज करावेत. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.