महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धा 2021 15 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धा 2021

  • 15 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु

भंडारा, दि.14:- जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 47 क्षेत्राशी संबंधित जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सेक्टर स्किल कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धा 2021 चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करुन निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यासाठी नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली असून जिल्ह्यातील युवक- युवतींनी 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2021 पर्यंत आपल्या नावाची नोंदणी https://kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळवर जावून वर्ल्ड स्किल कॉम्पिटीशन रजीस्ट्रेशन फॉर्म वर क्लिक करुन नोंदणी करावी .

जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन 17 ऑगस्ट 2021 ते 18 ऑगस्ट 2021 दरम्यान जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तांत्रिक विद्यालये, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्र, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण संस्था तसेच व्यवसाय प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेसाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत. उमेदवाराचा जन्म दिनांक 1 जानेवारी 1999 किंवा त्यानंतरचा असावा. थ्री डी डिजिटल गेम आर्ट, ऑटोबॉडी रिपेअर, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, कार पेंटिंग, सुतारकाम, क्लाउड कॉम्प्युटिंग, सीएनसी मिलिंग, पाककला, सायबरसुरक्षा, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, आयटी नेटवर्क कॅबलिंग, आयटी सॉफ्टवेअर सोल्युशन्स बिझनेस, ज्वेलरी, लँडस्केप गार्डनिंग, मेकॅनिकल अभियांत्रिकी सीएडी, मोबाईल रोबोटिक्स, प्लास्टरिंग आणि ड्रायवॉल सिस्टीम, प्लॅस्टिक इंजिनीअरिंग, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन – आरएसी, रेस्टॉरेंट सर्व्हीस, वेल्डिंग, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन टेक्नॉलॉजी, ग्राफिक डिझाईन टेक्नॉलॉजी इत्यादी 47 क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कौशल्य स्पर्धा 2021 चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर 47 क्षेत्रांची यादी वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, विद्यापीठे विज्ञान, कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in या लिंकवर भेट देऊन नाव नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करावे. तसेच इतर इच्छुक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी. नोंदणीचा अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2021 हा आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी महाराष्ट्र कौशल्य स्पर्धा 2021 मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त शैलेश भगत यांनी केले आहे.