चंद्रपूर : निसर्गाचे रक्षण व पर्यावरणाच्या संवर्धनाकरीता ‘माझी वसुंधरा’ अभियान

निसर्गाचे रक्षण व पर्यावरणाच्या संवर्धनाकरीता

माझी वसुंधरा अभियान

Ø चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 32 ग्रामपंचायतींचा सहभाग

चंद्रपूर दि. 6 ऑगस्ट : निसर्गाचे रक्षण व पर्यावरणाच्या संवर्धनाकरीता नागरी व ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्याबाबत शासनाने धोरण आखले आहे.  

मानवाची निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी, पृथ्वी तत्त्वाशी संबंधित वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरण इत्यादी बाबीवर कार्य करणे, वायुतत्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायु प्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, जलतत्वाशी संबंधित नदी संवर्धन, सागरी जैवविविधता, जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण तसेच सागरी किनारे यांची स्वच्छता करणे, अग्नी तत्वाशी संबंधित ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत करणे तसेच ऊर्जेचा अपव्यय टाळणे या बाबींना प्रोत्साहन देणे, अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीत जमिनी, शेताचे बांध यासारख्या जागेवर उपक्रम राबविणे या प्रमुख बाबींचा समावेश आहे.

या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात येत असून यामध्ये सदर योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 32 ग्रामपंचायती सहभागी होणार आहे. अभियानाअंतर्गत गावातील गावकरी, सेवाभावी संस्थांच्या सहकार्यातून नियोजन करणे, अभियानाची व्यापक अंमलबजावणी करणे, अभियान काळात शासनाने ठरवून दिलेल्या कामाचे उपक्रम राबविणे आवश्यक आहे.

माझी वसुंधरा या अभियानाच्या यशस्वितेकरीता पंचायतीने गावांमध्ये व्यापक प्रसिद्धी करावी, गावात जनजागृती करावी तसेच राबविण्यात येत असलेले उपक्रम कार्यक्रमाची माहिती वेळोवेळी केलेल्या कामाच्या नोंदी शासनाच्या वेबपोर्टलवर अद्यावत करावी व संपूर्ण माहिती ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध ठेवावी. तसेच या अभियानाच्या व्यापक अंमलबजावणीकरीता ग्रामस्थ मंडळ युवक व महिलांनी पुढाकार घेऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिलनाथ कलोडे यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना केले आहे.