कोकण, पश्चिम महाराष्ट्र व इतर भागात अतिवृष्टीमुळे बाधित 16 जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य

कोकणपश्चिम महाराष्ट्र व इतर भागात अतिवृष्टीमुळे

बाधित 16 जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य

-पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

·       पुरामुळे बाधित पाणीपुरवठा योजनांची तात्काळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश

·       पूर्ण योजना बाधित झालेल्या गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविणारनिधीची कमतरता भासू देणार नाही

·       1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित

             मुंबई दि. 27 : कोकण किनारपट्टी,पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून त्यादृष्टीने  युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत अशी माहितीपाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

16 जिल्ह्यात 1 हजार 129 पाणीपुरवठा योजना बाधित ;

42  कोटी 88 लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित

           अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील कोकणपश्चिम महाराष्ट्र व  इतर अशा 16 जिल्ह्यांमध्ये 1 हजार 129  पाणीपुरवठा योजना बाधित झाल्या आहेत.त्यापैकी काही योजना तातडीने सुरू करण्यासाठी डिझेल जनरेटरची व्यवस्था,क्लोरीनेशन करणेटँकरने पाणीपुरवठा करणेबोरवेलची किरकोळ दुरुस्ती,पंपाची दुरुस्तीपाणीपुरवठा लाईन दुरुस्त करणे या बाबींसाठी 11 कोटी 22 लाख रुपयांचा निधी तत्काळ लागणार आहे.तर जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी 31 कोटी 65 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. असे एकूण 42 कोटी 88 लाख रुपयांचा खर्च या योजनांसाठी लागणार आहे. तातडीची बाब म्हणून जिल्हा परिषद व स्थानिक प्रशासन त्यांच्या उपलब्ध निधीतून कामे सुरू करण्यात आलेली आहे. यासंदर्भात महसूल तसेच मदत व पुनर्वसन विभागाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.याव्यतिरिक्त ज्या ठिकाणी किरकोळ दुरुस्ती करून पाणीपुरवठा करणे शक्य आहे तेथे तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. तथापि वीज पुरवठा खंडित झालेला असल्यामुळे ज्या पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा करता येत नाही अशा ठिकाणी स्थानिक स्रोतांमधून (बोअरवेलविहीर) पाणीपुरवठा करण्यात येत आहे असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

टँकरद्वारे पाणीपुरवठा

            काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे तर आणखी आवश्यकता भासल्यास टँकर उपलब्ध करून त्याद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत.

पुरेसा व शुद्ध पाण्याचा पुरवठा

            आपद्ग्रस्त भागातील जनतेला पुरेसा व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिसार व इतर साथीचे आजार होऊ नये म्हणून क्लोरीनद्वारे पाणी शुद्धीकरण करणे तसेच परिसर स्वच्छतेच्या संदर्भातही आवश्यक ती  खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्यासह विभागाचे अपर मुख्य सचिवमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिवजल जीवन मिशनचे अभियान संचालक तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक हे नुकसानग्रस्त जिल्ह्यातील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

 बदलापूरअंबरनाथ शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या

जलशुद्धीकरण केंद्राची तात्काळ दुरुस्ती

            सततच्या पावसामुळे उल्हास नदीमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने बदलापूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उल्हास नदीवरील बॅरेज जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शिरल्याने येथील यंत्रणा पूर्णतः बिघडली होती. पुढील तीन दिवस ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी लागणार असल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार होती.परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम करून ही यंत्रणा अवघ्या दीड दिवसात पूर्ण केल्यामुळे पाण्याचा प्रश्न सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकला अशी माहितीही पाणीपुरवठा मंत्र्यांनी दिली.

भूजल सर्वेक्षण यंत्रणेची ठिकठिकाणी पथके कार्यरत

            अतिवृष्टीमुळे जे हॅन्ड पंपविद्युत पंप सोलर पंप  नादुरुस्त झाले आहेत,ज्या विहिरींमध्ये गाळ साचला आहे अशा ठिकाणी स्वच्छता करून ते तत्काळ दुरुस्त करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेची पथके प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत आहेत. कोल्हापूर येथे 4 सांगली येथे 2 तर रत्नागिरी येथे 2 अतिरिक्त पथके पाठविण्यात आली आहेत.

पाण्याचे नमुने तपासणी

            अतिवृष्टीमुळे बाधित जिल्ह्यातील पाण्याचे नमुने तपासण्याचे कामही भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेद्वारे करण्यात येत आहे अशी माहिती मंत्री श्री. पाटील यांनी दिली.

पूर्ण योजना बाधित झालेल्या गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविणार ;

निधीची कमतरता भासू देणार नाही

            पूर्ण योजना बाधित झालेल्या गावांसाठी नवीन योजना राबविण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही पाणीपुरवठा मंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी दिली.