वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रात थंडीचा कहर वाढणार, पावसाच्या इशाऱ्यानेही होणार परिणाम

वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रात थंडीचा कहर वाढणार, पावसाच्या इशाऱ्यानेही होणार परिणाम

Maharashtra Weather Update: डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटांचा इशारा देण्यात आलाय. उत्तरेकडील शीत वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात किमान तापमानात (Minimum Temperature) लक्षणीय घट झाली आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 10 अंशाच्या खाली गेल्याने नागरिकांना हुडहुडी भरलीय. केंद्रीय हवामान खात्याने उत्तर भारतात आज थंडीचा ऑरेंज अलर्ट जारी केल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. (Weather Update)

हवामान विभागाचा इशारा काय?

भारतीय हवामान विभागाने उत्तर भारतात थंडीचा अलर्ट जारी केलाय. या भागात बहुतांश क्षेत्रामध्ये दाट धुक्याचा अलर्ट देण्यात आला असून पर्वतीय क्षेत्रांवर सक्रिय होत असणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे उत्तरेत काही ठिकाणी पावसाचाही अंदाज आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा चंदीगडमध्ये दाट धुक्याची चादर कायम राहणार असून उत्तरेतील शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम राहणार आहे.

राज्यात पुढील 24 तासात गारठा वाढणार असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या शेवटी राज्यभरात नागरिकांना थंडीचा सामना करावा लागणार आहे. नववर्षातही थंड व कोरडे जमिनीलगत वारे उत्तरेकडून खाली येत असल्याने उत्तर महाराष्ट्र मुंबईसह लगतच्या काही भागांमध्ये तापमानात घट होण्याचा अंदाज आहे.