संभाजीनगर येथे बीबीएन ग्लोबलतर्फे व्यवसाय संवाद बैठक!
‘महाबीझ २०२६’ जागतिक व्यवसाय संधींबाबत उद्योजकांना मार्गदर्शन!
बीबीएन ग्लोबलतर्फे संभाजीनगर येथे उद्योजकांसाठी व्यवसाय संवाद बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी दुबई येथे ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या ‘महाबीझ २०२६’ या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेची माहिती देण्यात आली. या परिषदेमुळे महाराष्ट्र – मराठवाड्यातील उद्योजकांना निर्यात – आयात, गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय भागीदारी व जागतिक नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे जीएमबीएफ ग्लोबलच्या सदस्या प्रचिती तलाठी यांनी सांगितले.
या बैठकीस गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे सदस्य दिलीप खेडेकर यांनी महाराष्ट्रातील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यासाठी अशा संवादात्मक उपक्रमांचे महत्त्व त्यांनी यावेळी अधोरेखित केले. या बैठकीला जीएमबीएफ ग्लोबलच्या सदस्या प्रचिती तलाठी यांनी संबोधित केले. त्यांनी जीएमबीएफ ग्लोबल ही दुबईस्थित, ना – नफा व्यवसाय संघटना असून ती महाराष्ट्रातील उद्योजकांना दुबई, जीसीसी, मध्यपूर्व, आफ्रिका तसेच इतर जागतिक बाजारपेठांमध्ये व्यवसाय विस्तारासाठी संधी उपलब्ध करून देत असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी महाबीझ २०२६ या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेबाबत सविस्तर माहिती दिली. महाबीझ २०२६ ही ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२६ रोजी दुबई येथे आयोजित केली जाणारी द्वैवार्षिक जागतिक व्यवसाय परिषद आहे. या परिषदेत पंधराहून अधिक देशांतील सुमारे ८०० ते १००० प्रतिनिधी सहभागी होणार असून त्यामध्ये उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योग संघटना, निर्यातदार, सेवा क्षेत्रातील व्यावसायिक आणि स्टार्टअप्स यांचा समावेश असेल.
संभाजीनगर आणि मराठवाडा विभागातील उद्योजकांसाठी ‘महाबीझ २०२६’ मधून दुबई आणि जागतिक बाजारपेठेत निर्यात–आयात व व्यवसाय विस्ताराच्या संधी, जॉइंट व्हेन्चर आणि आंतरराष्ट्रीय भागीदारी, गुंतवणूकदारांशी थेट संपर्क, जागतिक नेटवर्किंगद्वारे नवीन ग्राहक आणि व्यवसाय करार, स्थानिक उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्याची संधी इत्यादी फायदे होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या “योग्य व्यासपीठ, मार्गदर्शन आणि नेटवर्क उपलब्ध झाल्यास संभाजीनगरसारख्या शहरांतील उद्योजकही जागतिक पातळीवर यशस्वी होऊ शकतात,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
बैठकीदरम्यान उपस्थित उद्योजकांनी दुबईतील उद्योग वातावरण, स्टार्टअप संधी, व्यापार धोरणे आणि गुंतवणूक प्रक्रियेबाबत प्रश्न विचारले. या संवादामुळे जागतिक व्यवसाय विस्तारासाठी आवश्यक माहिती आणि प्रेरणा मिळाल्याचे उपस्थितांनी सांगितले. ही बैठक उद्योजकांसाठी माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी दिशादर्शक ठरल्याचे बीबीएनजीच्या श्रीधर कुलकर्णी यांनी नमूद केले. ही बैठक यशस्वी होण्यासाठी श्रीधर कुलकर्णी, श्री. सुजित पोतदार आणि अतुल ठाकूर यांचं सहकार्य लाभलं.










