1 ते 15 जुलै या कालावधीत शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम
Ø जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण
चंद्रपूर, दि. 3 : केंद्र आणि राज्य शासन बालकांच्या नियमित शिक्षणासाठी तसेच बालके शाळाबाह्य होऊ नयेत यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी 1 ते 15 जुलै 2025 या कालावधीत शोध मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, महानगरपालिका, नगर पालिका / पंचायत यांचे नोडल अधिकारी, पर्यवेक्षक व प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे आणि त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. शिक्षणापासून कोणताही बालक वंचित राहू नये, 100 टक्के बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्कांची पूर्तता करणे, या उद्देशाने सर्व शासकीय विभागांनी एकत्रितपणे योग्य नियोजन करून कृती करणे व त्याचे सातत्याने सनियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळाबाह्य, स्थलांतरीत व शाळेत अनियमित असलेल्या बालकांची शोध मोहीम शिक्षण विभागासह अन्य विभागांच्या सहकार्याने करण्याचा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
शोध महिमेची कार्यपध्दती : 1) सदरची शोध मोहीम वस्ती, वाडी, गाव, वार्ड या स्तरावर पूर्ण करण्यात यावी. 2) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास), बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण/नागरी) यांच्याकडून गाव, केंद्र, बीट, विभाग व शाळा स्तरानुसार नियोजन तयार करून घेण्यात यावे. तसेच शोधमोहिम करणारे अधिकारी कर्मचारी यांची यादी बनविण्यात यावी. 4) यादीनुसार विषय व जबाबदा-या वाटप करून संबंधितांना आदेशित करण्यात यावे. 5) क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी जबाबदार अधिकारी यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून दिलेल्या तारखेप्रमाणे प्रत्यक्षात शोध मोहिमेस सुरुवात करून दैनिक अहवाल सादर करावा. 6) 1 जूलै ते 15 जूलै 2025 या कालावधीत शोध मोहिम पूर्ण करावी. 7) शाळाबाह्य बालकांच्या शोध मोहिमेत 18 वर्षे वयोमर्यादेपर्यंतच्या दिव्यांग बालकांचाही समावेश करण्यात यावा. 8) सदर शोध मोहीम प्रत्येक गावात व शहरात तसेच परिसरातील गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्टेशन, बसस्थानके, ग्रामीण भागातील बाजार, गावाबाहेरची पालं, वीटभटया, दगडखाण, मोठी बांधकामे, स्थलांतरीत कुटुंबे, झोपडया, फुटपाथ, सिग्नलवर/ रेल्वेमध्ये, फुले व अन्य वस्तू विकणारी तसेच रस्त्यावर भीक मागणारी बालके, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे, भटक्या जमाती इत्यादी विविध ठिकाणी काम करणारे बालमजूर, यांची माहिती या शोध मोहिमेत राबवायची आहे,
असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक यांनी कळविले आहे.