सिंदेवाही नगर पंचायत कडून जिल्हा न्यायाधीशाच्या आदेशाची अवहेलना देविदास ठाकरे यांचा पत्रकार परिषदेत आरोप
सिंदेवाही:- नगर पंचायत सिंदेवाही -लोणवाही अंतर्गत येत असलेल्या नागमंदिरच्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून विलास यादवराव बोरकर यांनी अवैध्य संरक्षण भिंतीचे बांधकाम केले असल्याने सिंदेवाही येथील देविदास ठाकरे आणि इतर नागरिकांनी नगर पंचायत कार्यालयाकडे तक्रार करून अतिक्रमण काढण्याची विनंती केली. त्यानुसार नगर पंचायत कार्यालयाने अतिक्रमण धारकाला नोटीस देऊन अतिक्रमण काढल्यास सांगितले. मात्र अतिक्रमण धारकाने काहीच प्रतिसाद न दिल्याने अखेर जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीशांनी अतिक्रमण काढण्यासाठी नगर पंचायत कार्यालयाला ६ महिन्यापासून आदेश दिला असताना अजूनही अतिक्रमण काढण्यात आले नसल्याने नगर पंचायत कडून जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेशाची अवहेलना होत असल्याचा आरोप तक्रारदार देविदास ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
सिंदेवाही येथील नागमंदिर मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर विलास यादवराव बोरकर यांनी अतिक्रमण करून संरक्षण भिंत उभी केली असल्याने लोकहितास बाधा ठरली आहे. त्यामुळे देविदास ठाकरे यांनी याबाबत नगर पंचायत कार्यालयाला तक्रार अर्ज देऊन अतिक्रमण काढण्यास विनंती केली. त्यानुसार नगर पंचायत कार्यालयाने १८ नोव्हेंबर २०२२ त्यानंतर ३१ जानेवारी २०२५, आणि २५ फेब्रुवारी २०२५ विलास यादवराव बोरकर यांना नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यास कळविले. मात्र अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण न काढता उलट सिंदेवाही येथील दिवाणी न्यायालयात तात्पुरती मनाई हुकूम याचिका दाखल केली..मात्र याचिक फेटाळल्याने जिल्हा सत्र न्यायालयात स्थगिती याचिका दाखल करण्यात आली. परंतु जिल्हा सत्र न्यायालयाने याचिका फेटाळून दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी अवैध्य असलेले संरक्षण भिंतीचे बांधकाम हटविण्यात यावे. असा नगर पंचायत कार्यालयाला आदेश दिला आहे. नगर पंचायत कार्यालयाने सदर अतिक्रमण धारकास १३ मार्च २०२५ रोजी अल्पमुदतीची नोटीस देऊन दिनांक १९ मार्च २०२५ ला अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे कळविले. मात्र प्रत्यक्षात ३ महिने उलटून गेले तरीही सदर अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याने नगर पंचायत कार्यालयाने जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केली असल्याचा आरोप तक्रारदार देविदास ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून करून तात्काळ सदर अतिक्रमण हटविण्यात यावे. अशी मागणी सुद्धा केली आहे.
——————————————————-
” तक्रारीचे अनुषंगाने नियमानुसार अतिक्रमण धारक विलास बोरकर यांचेवर कारवाही करून अतिक्रमण काढण्यात येईल.”
राहुल कंकाळ
मुख्याधिकारी
नगर पंचायत कार्यालय, सिंदेवाही.