यशकथा- 18 स्वयंरोजगारातून आर्थिक निर्भरता प्रविण बलणे यांची यशकथा

यशकथा- 18 स्वयंरोजगारातून आर्थिक निर्भरता प्रविण बलणे यांची यशकथा

 

स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) भंडारा ही ग्रामीण भागातील युवक युवतींना वेगवेगळ्या विषयावरील स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देते. याच प्रशिक्षणाचा फायदा घेवून आंबाडी (सिल्ली) या गावातील प्रविण राजकुमार बलणे या तरूणाने सेल फोन रिपेरिंग व सर्व्हिसींगचे प्रशिक्षण घेवून गावातच प्रविण मोबाईल शॉप या नावाचे स्वत: ची मोबाईल रिपेरिंगचे दुकान टाकले व नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगारातूनही आर्थिक निर्भर होता येते हे दाखवीले. बॅक ऑफ इंडिया अंतर्गत आरसेटी संस्थेमार्फत विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते.

 

आंबाडी (सिल्ली) गाव वैनगंगा नदीच्या जवळ असून हे अंदाजे 4 हजार वस्तीचे गाव आहे. या गावातील बहुतांश तरूण शेत मजुरीकडे वळले आहेत. या गावातील प्रविण बलणे यांना मोबाईल रिपेरींग करून स्वत: चा उदर निर्वाह करावा असे वाटले. यादम्यान स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या सेल फोन रिपेरींग प्रशिक्षणा विषयी त्यांना माहिती मिळाली. त्यांनी भंडारा येथील संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात सेल फोन रिपेरींग व सर्व्हिस या एक महिन्याच्या प्रशिक्षणात प्रवेश घेतला. येथे मोबाईल रिपेरींगचे शास्त्र शुध्द प्रशिक्षण घेतल्यानंतर भंडारा येथील मित्राच्या मोबाईल रिपेरींग दुकानात 1 वर्ष काम केले. दुरूस्तीच्या कामात तरबेज झाल्यावर प्रविणने स्वत:च्याच गावात मोबाईल दुरूस्तीचे काम सुरू केले. यासाठी लागणारे साहित्य, यंत्र सामग्री, सॉफ्टवेअर इत्यादी सामान दुकानासाठी खरेदी केले.

 

प्रविणचे दिवस-रात्र परिश्रम आणि मोबाईल दुरूस्तीचे कौशल्य पाहून त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली. केवळ 1 वर्षाच्या कालावधीत त्यानी या व्यवसायात प्राविण्य मिळविले. गावातील मित्रांनासुध्दा आपल्या अनुभवातुन ते सांगतात की स्वयंरोजगारातून आर्थिक संपन्नता मिळवता येते हे प्रविणने दाखवून दिले आहे. पदवी पर्यंत शिक्षण घेवून नोकरी करण्यापेक्षा स्वत: आपण दुसऱ्याना रोजगार देवू शकतो. हे आरसेटीतील प्रशिक्षणातून प्रविण बलणे यांना शिकता आले.

 

नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा छोटा का होईना व्यवसाय करून आर्थिक स्वावलंबी होवून इच्छीणाऱ्यांसाठी प्रविण यशस्वी उदहरण आहे.