शासकीय योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा – न्यायाधीश अंजू शेंडे
भंडारा, दि. 23 : शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती व लाभ देवून योजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शासकीय योजनांची माहिती नसल्यामुळे गरजू लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहचत नाही. त्यामुळे तळागाळातील सर्व गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचवा, असे निर्देश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा अंजू शेंडे यांनी प्रशासनाला दिले.
जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक व शासकीय सेवा महाशिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुहास भोसले, जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष आर. बी. वाढई, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ढोमणे, न्यायिक अधिकारी, अधिवक्ता व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
