विधी मार्गदर्शन व सायबर जनजागृती शिबिराचे आयोजन

विधी मार्गदर्शन व सायबर जनजागृती शिबिराचे आयोजन

चंद्रपूर, दि.4 नोव्हेंबर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सायबर सेल, चंद्रपूरच्यावतीने ग्रामपंचायत मोरवा येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या भवनात विधी मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, मोरवाचे उपसरपंच भुषण पिदुरकर, पडोलीचे पोलीस निरीक्षक श्री. कोंडावार, चंद्रपूर जिल्हा सायबर शाखेचे तज्ञ मार्गदर्शक मुजावर अली, शशिकांत मोकाशे तसेच शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व मोरवा येथील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी वेळेचा उपयोग व पोक्सो कायदा यावर प्रकाश टाकला. पोलीस निरीक्षक श्री. कोंडावार यांनी वाहन अधिनियम, रोडवरील दुचाकीचा वापर व होणारे अपघात यावर प्रतिबंध कसा लावता येईल, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर सायबर शाखेचे मुजावर अली यांनी सायबर अपराधाबाबतची माहिती देत त्यापासून प्रतिबंध कसा घालता येईल, यावर महाविद्यालयीन विद्यार्थी व उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच युवा वर्गाने स्वत:मध्ये कोणत्या प्रकारचे परिवर्तन आणल्यास गुन्हा आणि गुन्हेगारी पासून अलिप्त राहण्यास मदत होईल या विषयावर शशिकांत मोकाशे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उपसरपंच भुषण पिदुरकर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी सायबर सेलच्या वतीने प्रकाशित माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सायबर सेलचे संतोष पानघाटे यांनी केले.