प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील उद्दिष्ट पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेतील उद्दिष्ट पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोकण विभागाची आढावा बैठक

मुंबई, दि. 3 :- पथविक्रेते, फेरीवाल्यांसाठी कोरोना संकट कालावधीत सुरु करण्यात आलेली ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ अतिशय उपयुक्त असून महिनाभरात विभागांत दीड लाख लाभार्थींपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यासाठीचे तसेच विशेषत: मुंबईसाठीचे उद्दिष्ट सर्व संबंधित यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

राज्यस्तरीय बॅकर समितीची प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसंदर्भात कोकण विभागाची आढावा बैठक हॉटेल सहारा स्टार येथे झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार मनोज कोटक, गोपाळ शेट्टी, आमदार अॅड. आशिष शेलार, रमेश पाटील व बँक अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री स्वनिधी योजना पथविक्रेते, फेरीवाले यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असून लाभार्थींपर्यंत या योजनेचा लाभ सर्व संबंधित यंत्रणांनी पोहोचवण्यावर भर द्यावा. बँकांनी गरीब आणि रस्त्यावर छोटे व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांच्या उन्नतीसाठी संवेदनशील राहण्याचे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.

या योजनेत डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मोठे लक्ष्य गाठण्यासाठी जनजागृती, कर्जाच्या रकमेत वाढ, त्याचदिवशी वितरण, विविध शिबिरांमध्ये बँक अधिकाऱ्यांचा सहभाग यासह पीएम स्वनिधी योजनेचा आवाका वाढवण्यासंदर्भातही चर्चा झाली असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रात १ कोटी शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी पात्र आहेत आणि आतापर्यंत ८४ लाख शेतकऱ्यांना ते मिळाले आहेत. उर्वरित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध बँकांच्या सहकार्याने शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी मत्स्यव्यवसायात असलेल्यांचाही समावेश करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.