मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

भंडारा, दि. 1 : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली या विधानसभा मतदार संघात 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
            जिल्ह्यात एकूण 9 लाख 86 हजार 692 एवढे मतदार असून आजपर्यंत 6 हजार 699 मतदारांची वाढ झालेली आहे. तर 19 हजार 360 मतदारांची वगळणी करण्यात आलेली आहे. 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे, 1 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी आहे. 20 डिसेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे व 5 जानेवारी 2022 ला मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे अशा प्रकारे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम असणार आहे.
            दावे व हरकती स्विकारण्यासाठी दिनांक 13 (शनिवार) व 14 (रविवार) नोव्हेंबर 2021 आणि 27 (शनिवार) व 28 (रविवार) नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष ग्रामसभा सर्व ग्रामपंचायतीमध्ये 16 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येत असून मतदार यादीचे वाचन करुन मतदार यादी ग्रामसभेमध्ये गावातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी व तपासण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
            सदर मोहिमेचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवावे. मतदार यादीत दुरुस्ती करण्यासाठी दावे व हरकती असल्यास मतदार नोंदणी अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तहसील कार्यालय तसेच बीएलओ यांचेकडे विहित नमुन्यात अर्ज भरुन सादर करावा व सदर मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.