मिशन वात्सल्य अंतर्गत राजुरा येथे महिलांचा मेळावा ◆ महिलांना धनादेश व योजनांच्या लाभाचे प्रमाणपत्र वाटप

मिशन वात्सल्य अंतर्गत राजुरा येथे महिलांचा मेळावा ◆ महिलांना धनादेश व योजनांच्या लाभाचे प्रमाणपत्र वाटप

चंद्रपूर, दि. 27 ऑगस्ट : कोविडच्या महामारीत अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले असून अनेक मुलांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले आहे. तर काही घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने अनेक महिला एकल/ विधवा झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्येमुळे अनेक महिलांचे कुंकू पुसले गेले आहे. अशा महिलांना शासकीय योजनांचा लाभ व भविष्यातील वाटचालीबाबत आश्वस्त करण्यासाठी राजुरा येथे मिशन वात्सल्य अंतर्गत महिला मेळावा घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तर मंचावर राजूराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीश गाडे, तालुका कृषी अधिकारी चेतन चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते.

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे व त्यांचे यथायोग्य संगोपन करणे, एकल / विधवा महिलांचे योग्य पुनर्वसन करून त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे, भविष्याविषयी त्यांना अस्वस्थ करणे आणि समाजात अशा महिलांना मानाचे स्थान मिळवून देणे, हे शासन आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे. याच अनुषंगाने मिशन वात्सल्य अंतर्गत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कोविडमध्ये मृत्यू पावलेल्या कर्त्या पुरुषांच्या विधवांना अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 1 हजार रुपये याप्रमाणे एकूण 25 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करून लाभ सुरू करण्यात आला. तसेच शेतकरी आत्महत्या प्रकरणात पात्र आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसांना एक लक्ष रुपये मंजूर अनुदानाप्रमाणे 30 हजार रुपयांचा धनादेश प्रत्यक्षात देऊन उर्वरित 70 हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या नावे फिक्स डिपॉझिट करण्यात आला. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील लाभार्थ्यांना राजुरा पुरवठा विभागांतर्गत अंत्योदय शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले तर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील चार पात्र वारसाचे केशरी शिधापत्रिकेमधून अंत्योदय शिधापत्रिकेमध्ये रूपांतर करून लाभ देण्यात आला.

कृषी विभागातर्फे विविध योजनांची माहिती व परसबाग भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत विविध योजनांची माहिती, पाल्यांच्या जन्माचा दाखला व बालसंगोपण योजनेची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तालुकास्तरीय यंत्रणेचे अधिकारी – कर्मचारी तसेच महिला उपस्थित होत्या.