आजपासून ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम Ø नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

आजपासून ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम Ø नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

चंद्रपूर, दि. 12 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नागरीकांमध्ये देशाभिमान जागृत व्हावा, या उद्देशाने दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता प्रियदर्शनी सभागृह येथे जिल्हा प्रशासनाद्वारे देशभक्तीवर गीतांचा (ऑर्केस्ट्रा) कार्यक्रम आयोजित आहे.

9 ऑगस्टपासून स्वराज्य महोत्सवास प्रारंभ झाला असून त्यामध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महापालिका, जिल्ह्यातील सर्व नगर परिषद / पंचायती, ग्रामपंचायत यांसोबतच विविध संस्थांनी सहभाग नोंदविला आहे. विविध शासकीय यंत्रणेमार्फत विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरी, सायकल रॅली, चित्रकला, निबंध, रांगोळी स्पर्धांचे आयोजन तसेच ऐतिहासिक वास्तूंना केलेली रोषणाई अशा उपक्रमांमुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले आहे.

स्वयंस्फूर्तीने घरांवर तिरंगा लावावा :

शनिवार, दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत नागरिकांनी घरे, शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतींवर राष्ट्रध्वजाची स्वयंस्फुर्तीने उभारणी करण्यासाठी ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनीही त्यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेऊन घरावर तिरंगा ध्वज लावावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.