कपाशीवरील रस शोषक किडी व गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन

कपाशीवरील रस शोषक किडी व गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन

गडचिरोली, दि.05: कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे ह्या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा ह्या किडीचा प्रादुर्भाव जुलैच्या दुस-या आठवड्यापासून आढळून येतो, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकिड्यांचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आढळून येतो. तर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव डोमकळ्यांच्या स्वरुपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो. वरील सर्व प्रकारच्या किडींमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते कि, सुरवातीपासूनच खालील उपाययोजनाचा अवलंब करून या किडींचे व्यवस्थापन केल्यास पिकाचे होणारे नुकसान ब-याच प्रमाणात कमी करता येते. बीटी कपाशीच्या बियाण्याला ईमाडाक्लोप्रीड किंवा थायोमेथॉक्साम कीटकनाशकांची बीज प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे रस शोषक या किडीपासून सर्वसाधारण २ ते ३ आठवड्यापर्यंत संरक्षण मिळते म्हणून या काळात किटकनाशकांची फवारणी करू नये.

वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांदया, पाने, इतर पालापाचोळा जमाकरून किडींसहित नष्ट कराव्या. पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिकळे चिकट सापळे (२५/हे.) लावून नियमित पांढरी माशीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवावे.

कपाशीत चवळीचे आंतर पीक घ्यावे या चवळी पीकावर कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे पोषण होईल. वेळेवर आंतर मशागत करून पीक तणविरहीत ठेवावे त्यामुळे किडीच्या पर्यायी खाद्य तणांचा नाश होईल. तसेच बांधावरील किडीच्या पर्यायी खाद्य तणे जसे अंबाडी, रानभेंडी इ नष्ट करावी. मृदा परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करून जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा तसेच दोन ओळीतील व दोन झाडातील अंतर योग्य तेच ठेवावे जेणेकरून कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही आणि पीक दाटणार नाही पर्यायाने अशा पीकावर किडही कमी प्रमाणात राहील.

रस शोषक किडीवर उपजिवीका करणारे नैसर्गिक किटक उदा. सीरफिड माशी, कातीन ढालकिडे, क्रायसोपा इ. संख्या पुरेशी आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा. रसशोषक कीडीसाठी कपाशीचे पिकाचे प्रादूर्भावाबाबत सर्वेक्षण करावे. सरासरी संख्या १० मावा / पान किंवा २ ते ३ तुडतुडे / पान किंवा दहा फूलकिडे/पान किंवा मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या दहा / पान किंवा त्यापेक्षा जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेजीन २५ टक्के प्रवाही २० मि.ली. किंवा डॉयफेथ्युरॉन ५० टक्के पा. मि. भूकटी १२ ग्रॅम किंवा फिप्रोनिल ५ टक्के प्रवाही ३० मि. ली. किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के २.५ मि.ली. यापैकी कोणतेही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पिक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनंतर फेरोमोन सापळ्याचा वापर करावा. पिकाच्या वाढीव अवस्थेच्या उंचीनुसार किमान एक फूट अंतर ठेवावे जेणेकरून फेरोमोन सापळ्याच्या प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळयामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० फेरोमोन सापळे लावावेत. प्रत्येक गावात, कापूस संकलन केंद्रे व जीनींग फॅक्टरीमधे १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवडयाने पतंगाचा नायनाट करावा.

पिकातील डोमकळया नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढयांचा जीवनक्रमास वेळीच आळा घालता येईल पिक उगवणी नंतर ३५ ते ४० दिवसांपासून दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझॅडिरेक्टिन ३००० पीपीएम ४० मिली प्रति १० ली पाणी या प्रमाणे फवारणी करावी. पिक उगवणी नंतर ७५ ते ८० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा बॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्र किटकाची १.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी चार वेळा शेतात सोडावे.

गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवडयाला एकरी शेताचे प्रतिनीधीत्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली सांगीतल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा क्लोरेंट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.