प्रायोगिक तत्वावर नाल्यांना जाळीचे आच्छादन चंद्रपूर महानगरपालिका व जेसीआय चंद्रपूर ऑरबिटद्वारा उपक्रम

प्रायोगिक तत्वावर नाल्यांना जाळीचे आच्छादन
चंद्रपूर महानगरपालिका व जेसीआय चंद्रपूर ऑरबिटद्वारा उपक्रम

चंद्रपूर – ५ जुन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चंद्रपूर महानगरपालिका व जेसीआय चंद्रपूर ऑरबिट द्वारा झरपट नदी अंचलेश्वर गेट जवळील नाल्याच्या मुखावर जाळीचे आच्छादन लावण्यात आले. आयुक्त राजेश मोहीते यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांचा हस्ते या उपक्रमाची सुरवात करण्यात आली.
नाल्यातुन पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात कचरा वाहत असतो. वाहणार्‍या नाले, गटारे यामध्ये वारंवार टाकण्यात येणारा कचरा अथवा टाकाऊ पदार्थ यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. परिणामी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. या कचऱ्यामुळे अनेकदा पाण्याचा प्रवाहसुद्धा रोखला जातो आणि प्रवाहासोबत वाहत गेल्यास पुढे नदीत जमा होऊन नदीचे पाणी प्रदुषित करतो. जाळीचे आच्छादन लावल्यास कचरा जाळीतच जमा होईल व नदीच्या प्रवाहात जाणार नाही या उद्देशाने झरपट नदी अंचलेश्वर गेट जवळील छोट्या नाल्याच्या मुखावर जाळीचे आच्छादन लावण्यात आले आहे.
सदर जाळीचे आच्छादन प्रायोगिक तत्वावर लावण्यात आले असुन नाल्यातुन पाण्यासोबत येणारे प्लास्टीक व इतर स्वरूपाचा कचरा यात जमा होणार आहे. मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे वेळोवेळी हा कचरा काढण्यात येऊन जाळी स्वच्छ करण्यात येणार आहे.
या प्रसंगी मनपा अधिकारी, कर्मचारी, जेसीआय चंद्रपूर ऑरबिटतर्फे अध्यक्ष हरीश मुथा, सचिव अमित पोरेड्डीवार, मार्गदर्शक मनिष तिवारी, पुर्व अध्यक्ष हितेश नथवानी, अनुपम भगत,हरप्रीत गोथरा व अन्य जेसीआय सदस्य उपस्थीत होते.