कोविडमुळे विधवा महिला शासकीय योंजनापासुन वंचित राहु नये याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

कोविडमुळे विधवा महिला शासकीय योंजनापासुन वंचित राहु नये याची दक्षता घ्या – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

Ø ‘मिशन वात्सल्य’ योजनेचा आढावा

चंद्रपूर दि. 1 जून: कोविडमुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन अनेक महिला एकल विधवा झाल्या आहेत. या महिलांचे योग्य पुनर्वसन करून त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ प्राधान्याने देऊन या महिला शासकीय योजनेपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी. अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी तालुका समन्वय समितीला दिल्या.

            जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात मिशन वात्सल्य योजनेचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी  महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, कायदा व परिविक्षा अधिकारी सचिंद्र नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, कनिष्ठ संरक्षण अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

तालुक्यातील एकही विधवा महिला शासकीय योंजनापासुन वंचित राहु नये, असे सांगुन  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, एकल विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय समन्वय समित्यांनी शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा अशा महिलांना लाभ मिळवून देण्याची कार्यवाही तातडीने करावी. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्राची पूर्तता करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

जिल्ह्यामध्ये 436 विधवा महिलांना शिधापत्रिकेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. तसेच 447 महिलांना कार्यवाही करुन बँक खातेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. कुटुंब निवृत्तीवेतन योजनेस पात्र असलेल्या 19 महिलांपैकी 18 महिलांना कुटुंब निवृत्तीवेतन योजनेचा लाभ देण्यात आला असुन संजय गांधी निराधार योजनेस पात्र असलेल्या 307 कोविड विधवा महिलांना लाभ देण्यात आला आहे. तालुकास्तरीय समन्वय समितीने कार्यवाही करून एकूण 336 महिलांना वारस प्रमाणपत्राचा लाभ मिळवून दिला आहे. कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीची एलआयसी किंवा इतर विमा पॉलिसी असलेल्या एकूण 39 महिलांना विमा पॉलिसीचा लाभ मिळवून देण्यात आला असून 350 महिलांना जातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यात आले आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेस पात्र असलेल्या 45 विधवा महिलांना लाभ देण्यात आला आहे.

तसेच पात्र असलेल्या 7 पैकी 6 महिलांना श्रावणबाळ योजनेचा तर पात्र असलेल्या 29 महिलांपैकी 22 महिलांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेस पात्र असलेल्या सहा महिलांना लाभ देण्यात आला असुन इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेस पात्र एका महिलेस लाभ देण्यात आला आहे. घरकुल योजनेत पात्र आठ महिलांना घरकुल योजनेचा लाभ तर अंत्योदय योजनेस पात्र 77 महिलांना लाभ मिळवून देण्यात आला आहे.

कोव्हीडमध्ये दोन्ही किंवा एक पालक गमाविलेल्या एकुण 624 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ प्रत्यक्ष मिळवुन देण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत यांनी यावेळी दिली.  यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मिशन वात्सल्य योजनेतंर्गत असणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला