एकल प्लास्टिकचा वापर केल्यास होणार पाच हजाराचा दंड

एकल प्लास्टिकचा वापर केल्यास होणार पाच हजाराचा दंड

चंद्रपूर १ जुन –  एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलैपासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन वापर करतांना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व थर्माकोल, अन्नपदार्थ व मिठाईचे बॉक्स पॅकेजिंगसाठी  वापरण्यात येणारे प्लास्टीक, आमंत्रण कार्ड, हवाई फुग्यांसाठी वारण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या काड्या,सिगरेट पाकिटावर आवरण म्हणून वापरले जाणारे प्लास्टीक, प्लास्टिकचे झेंडे,प्लास्टिक फलक, कॅण्डी, आईसक्रिम कांड्या, प्लास्टिक प्लेटस, कप, ग्लासेस, चमचे,सजावटीसाठी वापरले जाणारे थर्माकोल व इतर साहित्याचा बंदीमध्ये समावेश आहे.
एकल वापर प्लास्टिकचे लवकर विघटन होत नाही. विघटन प्रक्रियेला अनेक वर्षांचा कालावधी लागतो. पर्यावरणाला धोका निर्माण झाला असल्याने एकल वापर प्लास्टीक बंदीसाठी कारवाई करण्यात येणार आहे. एकल वापर प्लास्टीक बंदी लागू झाल्यानंतर महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा याचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाईल, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांचा कारावास अशी शिक्षा राहणार आहे.
एकल वापर होणाऱ्या प्लास्टिकच्या विविध वस्तूंऐवजी निसर्गपूरक इतर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने कापडी पिशव्या, कागदापासून बनविलेल्या पिशव्या, बांबू, लाकडी वस्तू, सिरामिक्सची प्लेट, वाट्या आदी चांगले पर्याय आहेत. नागरिकांनी अशा निर्सगपूरक वस्तूंचा वापर अधिकाधिक करावा, प्लास्टिकच्या वस्तूंपासून पर्यावरणाला अधिक धोका निर्माण होऊ नये, या दृष्टीने यावर पुनर्प्रक्रीया करण्यावर अधिक भर द्यावा असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.