विशेष वृत्त/जिल्ह्यात 43 हजार हून अधिक शासकीय सेवांचा लाभार्थ्यांना थेट लाभ

विशेष वृत्त/जिल्ह्यात 43 हजार हून अधिक शासकीय सेवांचा लाभार्थ्यांना थेट लाभ

· शासन आपल्या दारी या अभियानाची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावनी

 

भंडारा : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ 13 मे रोजी सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातही या अभियानात 43 हजार 194 लाभार्थ्यांना विविध विभागांनी शासकीय लाभांचे वाटप केले आहे.

 

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे 961 लाभार्थ्यांना वैयक्तीक शौचालय, सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबतचे लाभ देण्यात आले. सर्वाधिक लाभ तहसिल कार्यालय भंडारा या कार्यालयाने दिले आहे. त्यामध्ये जातींचे प्रमाणपत्र, उत्पन्न व अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, संजय गांधी निराधार अनुदान योजना, 7/12 वाटप, फेरफार, शिधापत्रिका धारकांना लाभ, दिव्यांग लाभार्थ्यांना शिधा पत्रिका, राष्ट्रीय कौटुंबिक अर्थसाहाय्य योजना यासह विविध योजनांचे 13 हजार 389 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहे. जिल्हा परिषद कृषि विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि योजना, बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना तसेच बायोगॅस सनियंत्रण योजना या बाबतचे एकूण 383 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहे.

 

राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून या अभियानाचा आढावा घेण्यात येतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हा आहे. शासन आपल्या दारी अभियान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

 

दिनांक 4 मे च्या शुध्दीपत्रकानुसार जत्रा शासकीय योजनांची या उपक्रमाचे नाव शासन आपल्या दारी करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक शासकीय विभागामार्फत लाभार्थ्यांना त्यांचे लाभ शिबीराद्वारे मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची सुलभता झाली आहे. दिनांक 15 एप्रिल ते 15 जुन पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.