‘पाथ’ च्या माध्यमातून होणार आरोग्य संस्थांचे बळकटीकरण               Ø जिल्हाधिका-यांची अभिनव संकल्पना

‘पाथ’ च्या माध्यमातून होणार आरोग्य संस्थांचे बळकटीकरण              

 

Ø जिल्हाधिका-यांची अभिनव संकल्पना

 

चंद्रपूर, दि. 31 : कोविड – 19 च्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणेसमोर काही नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत सुधारणा व एकात्मिक प्रयत्न करणे गरजेचे व अत्यावश्यक झाले आहे. याचाच एक भाग म्हणून ‘पाथ’ (Programme for Appropriate Technology in Health) या संस्थेमार्फत चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.

 

भारतीय सार्वजनिक आरोग्य मानांकने व राष्ट्रीय गुणवत्ता हमी देखरेख कार्यक्रम यांच्या मानकाप्रमाणे जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे (प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय) ‘पाथ’ या संस्थेमार्फत फेरमुल्यांकन करण्यात येईल. तसेच निघालेल्या त्रृटींची पुर्तता करून जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण केले जाईल. यासाठी पहिली पायरी म्हणून जिल्हास्तरीय आरोग्य अधिकारी , पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र यांची कार्यक्षमता वृध्दी करण्यासाठी 1 व 2 फेब्रुवारी रोजी आभासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

त्यानंतर टप्प्याटप्प्यानी आरोग्य संस्थांचे मुल्यमापन करून बळकटीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. चंद्रपूर जिल्ह्यातील 63 प्राथमिक आरोग्य केंद्र, 10 ग्रामीण रुग्णालये, 100 खाटांचे एक उपजिल्हा रुग्णालय व 50 खाटांचे दोन उपजिल्हा रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांची ही अभिनव संकल्पना असून यात मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसुध्दा मोलार्च सहकार्य मिळत आहे. तसेच हा प्रकल्प जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके यांनी कळविले आहे.