महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणूक 28,29,30 जानेवारीला दारु विक्री बंद

महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणूक 28,29,30 जानेवारीला दारु विक्री बंद

 

भंडारा, दि. 24 : महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणुकीसाठी 2 पदवीधर तसेच 3 शिक्षक मतदारसंघाची दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे मतदान 30 जानेवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे 28 जानेवारीला सायंकाळी चार वाजता पासून, 29 जानेवारी रोजी पूर्ण दिवस व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी, 30 जानेवारीलाही पूर्ण दिवस या 3 दिवशी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले आहेत.

 

जिल्हयाची संवेदनशिलता लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीकोणातून निवडणूक कालावधीत मद्यविक्री करण्यास मनाई केली आहे. कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता संपूर्ण जिल्हयाच्या मतदानाच्या निर्वाचन क्षेत्रातील किरकोळ मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 135-सी अन्वये निवडणूक होत असलेल्या जिल्हयातील विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निर्वाचन क्षेत्रातील सर्व मंजूर व कार्यान्वीत असलेल्या सर्व नमुना सीएल-2, सीएल-3, सीएल / एफएल / टिओडी-3, नमुना-ई, एफएल-1, एफएल-2, एफएल-3. एफएल/बीआर-2 व टड 1 अनुज्ञप्त्या 28,29,30 जानेवारी या दिवशी बंद राहतील, असे आदेशीत करण्यात आले आहे. या आदेशाचा व नियमातील तरतुदीचा जे अनुज्ञप्तीधारक भंग करतील त्यांचे विरुद् कडक कारवाई करण्यात येईल.