कॅटरर्स यांनी कचऱ्याचे निवारण शास्त्रीय पद्धतीने करावे – आयुक्त विपीन पालीवाल  

कॅटरर्स यांनी कचऱ्याचे निवारण शास्त्रीय पद्धतीने करावे – आयुक्त विपीन पालीवाल  

अन्यथा होणार दंडात्मक कारवाई

लवकरच मिळणार ऑन कॉल कचरा गाडीची सुविधा  

 

चंद्रपूर १० जानेवारी – शहरातील कॅटरर्स द्वारा मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थ स्वरूपी घन कचऱ्याची निर्मिती होते. मात्र सदर कचरा सार्वजनीक ठिकाणी अनेकदा फेकलेला आढळून येतो. यापुढे कॅटरर्स द्वारा घन कचऱ्याचे निवारण शास्त्रीय पद्धतीने न केल्यास अथवा घन कचरा बाहेर फेकलेला आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.

विघटनशील कचऱ्याचे निवारण करण्याच्या दृष्टीने शहरातील कॅटरर्स यांची आढावा सभा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात १० जानेवारी रोजी आयोजीत करण्यात आली होती.१०० किलोपेक्षा अधिक कचरा निर्मिती करणारे अथवा त्या शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्यांना बल्क वेस्ट जनरेटर म्हंटल्या जाते. घन कचरा निवारण नियम २०१६ नुसार बल्क वेस्ट जनरेटरला त्यांच्या स्तरावर कचऱ्याची विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे.

लग्न समारंभ, वाढदिवस, नामकरण अश्या अनेक प्रसंगी कॅटरर्सची आवश्यकता असते. या विशेष प्रसंगी मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थ बनविले जातात. वेळेवर कमी पडू नये म्हणुन आवश्यकतेपेक्षा ज्यास्तीचे अन्न सुद्धा अनेकदा बनविण्यात येते. समारंभानंतर हे अन्न काही कॅटरर्स द्वारा नदी,नाल्यात, उघड्यावर, कचऱ्यात, रस्त्याच्या कडेला काही प्रसंगी जंगल परिसरात सुद्धा गाडीने आणुन टाकले जाते. यामुळे घन कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण तर होतोच शिवाय कचऱ्याच्या वासाने जंगली जनावरे सुद्धा आकर्षित होण्याची शक्यता असते. यातील विघटित न होणारा कचरा विशेषतः प्लास्टीक पोटात गेल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे समारंभ प्रसंगी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे निवारण कम्पोस्टिंग द्वारा खतनिर्मिती करणे,मिनी बायो गॅस द्वारे बायो मिथिनायझेशन प्रक्रिया करणे या शास्त्रीय प्रक्रियांद्वारे करावे अथवा ओला व सुका कचरा वेगवेगळा करून मनपाच्या अष्टभुजा रोड स्थीत डम्पिंग साईट वर आणुन देणे अनिवार्य आहे.

काही कॅटरर्सकडे मोठा कचरा नेण्यास गाडी नसते तेंव्हा लवकरच ऑन कॉल कचरा गाडीची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच अनाथालय, बेघर निवारा, गरजुंपर्यंत हे अन्न कसे पोहचेल किंवा जे अन्न प्राणी खाऊ शकतात ते स्वयंसेवी संस्थांद्वारे पोचविण्याची प्रणाली करण्याचे नियोजन केले जाणार आहे. शहर आपलेच असल्याने कचरा फेकुन देण्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. तेव्हा कॅटरर्स यांनी सदर पर्यायांचा अवलंब करून आपल्या स्तरावर कचऱ्याचे निवारण करावे व अन्न उघड्यावर टाकु नये अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.