नागपूरची वंशिका दोडके ‘खेलो इंडिया अस्मिता U-15 रग्बी लीग’ (पश्चिम विभाग) अजमेर येथे महाराष्ट्र संघाच करणार प्रतिनिधित्व.
रग्बी असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे अत्यंत अभिमानाने जाहीर करण्यात येते की, नागपूर जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडू वंशिका सुरेखा धर्मराज दोडके हिची निवड खेलो इंडिया अस्मिता U-15 रग्बी लीग (पश्चिम विभाग) या स्पर्धेसाठी झाली आहे. ही स्पर्धा १३ व १४ डिसेंबर २०२५ रोजी अजमेर (राजस्थान) येथे पार पडणार असून रग्बी असोसिएशन ऑफ नागपूरसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने ६ ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत बार्न्स स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, देवळाली (नाशिक) येथे ‘महा कॅम्प व निवड चाचण्या’ आयोजित करण्यात आल्या होत्या. या निवड चाचणीत संपूर्ण महाराष्ट्रातून U-15 वयोगटात सुमारे ५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला, त्यापैकी कठोर निवड प्रक्रियेनंतर १२ खेळाडूंचा महाराष्ट्र संघ निश्चित करण्यात आला, ज्यामध्ये वंशिकाने उल्लेखनीय कामगिरी करत आपले स्थान निश्चित केले.
वंशिकाने यापूर्वी U-14 स्कूल नॅशनल रग्बी चॅम्पियनशिप २०२४ मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करून कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले होते. सातत्यपूर्ण सराव, जिद्द व खेळातील परिपक्वतेच्या जोरावर ती राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर सातत्याने पुढे सरकत आहे.
वंशिका नागपूर जिल्ह्यातील आदिवासी भागातून आलेली असून तिचे कुटुंब अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगत आहे. वडील शेतकरी असून माता मजुर म्हणून काम करतात. प्रतिकूल परिस्थितीतही तिने दाखवलेली चिकाटी, समर्पण आणि प्रगती आज अनेक मुलींना प्रेरणा देत आहे. तिच्या यशामुळे नागपूर व आदिवासी समाजातील बालिकांना क्रीडाक्षेत्रात पुढे येण्यासाठी नवी ऊर्जा मिळत आहे.
अमर भंडारवार, प्रशिक्षक व सचिव, रग्बी असोसिएशन ऑफ नागपूर आणि अनेक महराष्ट्रातील वरिष्ठ प्रशिक्षक यांच्या मते, “वंशिका सातत्य आणि कठोर परिश्रम कायम ठेवत राहिली, तर आगामी येत्या काही वर्षांत ती भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्पर्धांत करण्याची क्षमता बाळगते. तिची कामगिरी प्रभावी असून मनापासून अभिनंदन व उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा.”
रग्बी असोसिएशन ऑफ नागपूर, युवा खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या रचनात्मक प्रयत्नाबद्दल रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांचे आभार मानते. त्यांच्या नियोजन व प्रशिक्षणामुळे राज्यातील खेळाडूंना मोठ्या पातळीवर चमकण्याचा मार्ग निर्माण झाला आहे.
संघटनेचे सर्व सदस्य, प्रशिक्षक, खेळाडू आणि रग्बी असोसिएशन ऑफ नागपूरशी संबंधित सर्वजण वंशिकाच्या यशाबद्दल अतिशय अभिमान बाळगून तिला अजमेरमधील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहेत.









