वीज क्षेत्रातील संशोधन, तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी ‘नॉलेज शेअरींग’ गरजेचे – संचालक श्री. सचिन तालेवार

वीज क्षेत्रातील संशोधन, तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी ‘नॉलेज शेअरींग’ गरजेचे – संचालक श्री. सचिन तालेवार

महावितरण व रामदेवबाबा विद्यापीठात सामंजस्य करार

नागपूर, दि. १६ नोव्हेंबर २०२५: वीज क्षेत्राची व्याप्ती वाढत असल्याने नवीन संशोधन व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तसेच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाला व्यावहारिक ज्ञानाची जोड देण्यासाठी ‘नॉलेज शेअरींग’ ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (संचालन/प्रकल्प) सचिन तालेवार यांनी केले.

महावितरण आणि नागपूर येथील रामदेवबाबा विद्यापीठ यांच्यामध्ये वीजक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व घडामोडी, ज्ञानाचे आदानप्रदान आदींसाठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्य पाहुणे म्हणून संचालक श्री. सचिन तालेवार बोलत होते. या तीन वर्षांच्या सामंजस्य करारावर रामदेवबाबा विद्यापीठाकडून कुलगुरू डॉ. राजेश पांडे यांनी तर महावितरणकडून मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी स्वाक्षरी केली. यावेळी मुख्य अभियंता डॉ. मनीष वाठ (मुंबई) यांच्यासह विद्यापीठाचे विविध विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या सामंजस्य करारानुसार महावितरणच्या नागपूर प्रशिक्षण विभागाकडून रामदेवबाबा विद्यापीठाच्या विद्युत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना बदलते वीजक्षेत्र, महावितरणमधील आधुनिक तंत्रज्ञान आदींसह वीजक्षेत्रातील माहिती व तंत्रज्ञान प्रत्यक्षात जाणून घेता येणार आहे. त्यांना महावितरणच्या प्रशिक्षण संस्थेत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येईल व उद्योग-आधारित प्रकल्प करण्याची संधी मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत वाढ होईल.

तसेच रामदेवबाबा विद्यापीठातील नवीन संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती महावितरणच्या अभियंता, अधिकारी व तांत्रिक कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे तांत्रिक ज्ञान आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढेल. आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण झाल्याने वितरण प्रणाली अधिक स्मार्ट व कार्यक्षम होईल, ज्याचा फायदा थेट ग्राहकांना होईल. यासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांची गुणवत्ता आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी विद्यापीठाच्या मदतीने प्रशिक्षण विभागासाठी विशेष अभ्यासक्रम तयार केले जाणार आहे.