कै. श्री. बी.जी.देशमुख वार्षिक निबंधलेखन स्पर्धा जाहीर; २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे निबंध सादर करण्याचे आवाहन

कै. श्री. बी.जी.देशमुख वार्षिक निबंधलेखन स्पर्धा जाहीर; २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे निबंध सादर करण्याचे आवाहन

मुंबई, दि.११ : भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा यांच्यातर्फे कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२५-२०२६ जाहीर करण्यात आली आहे. निबंध स्पर्धा सर्वांसाठी खुली असून निबंध कागदाच्या एकाच बाजूस टंकलिखित करून त्यावर केवळ टोपणनाव लिहावे. निबंधाच्या चार प्रती तयार करून २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संस्थेकडे सादर करावे, असे भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे मानद सचिव विजय सतविर सिंह यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

या वर्षीच्या स्पर्धेसाठी १) कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग (Era of Artificial Intelligence), २) सोशल मीडिया : आव्हाने आणि संधी (Social Media: Challenges and Opportunities), ३) नागरिकांचे जीवन सुलभ करणे (Ease of Living) हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

स्पर्धेतील निबंध इंग्रजी किंवा मराठी भाषेत सादर करता येतील. निबंध तीन हजार शब्दांपेक्षा कमी आणि पाच हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा. निबंध विषयानुसार विश्लेषणात्मक, संशोधनपर आणि पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे.

स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा ओळख नमूद करू नये. स्पर्धकाचे नाव, टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल पत्ता स्वतंत्र लिफाफ्यात नमूद करून पाठवावा.

स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, अधिक माहिती आणि नियमावलीसाठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.iipamrb.org.in भेट देता येईल. असेही मानद अध्यक्ष, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा,मंत्रालय मुंबई यांनी कळविले आहे.