शेतकरी पॅकेजमुळे नुकसानग्रस्त भागातील बळीराजा पुन्हा उभा राहील
Ø आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केला विश्वास
चंद्रपूर, दि. 08 : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले. या संकटाच्या काळात राज्य शासन शेतक-यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. नुकसानग्रस्त भागात 65 मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमुळे नुकसानग्रस्त भागातील बळीराजा पुन्हा उभा राहील, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केला.
शेतक-यांसाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी आर्थिक मदत आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, राज्य शासनाने जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांसह पिके, जनावरे, गोठे, दुकाने, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही जणांचे मृत्यूही झाले आहेत. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे, असेही पालकमंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.
शेतक–यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत : राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे 29 जिल्हे प्रभावित झाले आहेत. नुकसानग्रस्त 253 तालुके आणि 2059 मंडळांमध्ये मदतीसाठी 65 मिलीमिटर पावसाची अट न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येणार असून राज्य शासनाने 31 हजार 628 कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेजनुसार कोरडवाहू शेतीसाठी प्रति हेक्टरी 18 हजार 500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27 हजार रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 32 हजार 500 रुपये मदत दिली जाणार आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक मदत आहे.
असे आहे नुकसानग्रस्त शेतक–यांसाठी जाहीर केलेले पॅकेज : 1) मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लक्ष रुपये, 2) जखमी व्यक्तींना 74 हजार ते 2.5 लक्ष रुपये, 3) घरगुती भांडे, वस्तूंचे नुकसान – 5 हजार रुपये प्रतिकुटुंब, 4) कपडे, वस्तूंचे नुकसान- 5 हजार रुपये प्रति कुटुंब, 5) दुकानदार, टपरीधारकांना 50 हजार रुपये, 6) डोंगरी भागात पडझड, नष्ट पक्क्या घरांना 1 लक्ष 20 हजार रुपये, 7) डोंगरी भागात पडझड, नष्ट कच्च्या घरांना 1 लक्ष 30 हजार रुपये, 8) अंशतः पडझड – 6500 रुपये, 9) झोपड्यांच्या नुकसानीसाठी 8 हजार रुपये, 10) जनावरांचे गोठे नुकसान – 3 हजार रुपये, 11) दुधाळ जनावरांसाठी 37 हजर 500 रुपये, 12) ओढकाम करणा-या जनावरांसाठी 32 हजार रुपये, 13) कुक्कुटपालन 100 रुपये.
निकषांपेक्षा जास्त मदत जाहीर : एनडीआरएफचे निकष हे 2 हेक्टरपर्यंत आह. परंतु राज्य शासनाने त्यापेक्षा अधिक म्हणजे 3 हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली आहे. निकषापेक्षा अधिकची मदत देण्यासाठी 10 हजार कोटी रुपये अतिरिक्त मंजूर करण्यात आले आहे. शेतक-यांना प्रति हेक्टर 48 हजार रुपये, खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47 हजार प्रतिहेक्टर रोखीने आणि मनरेगाअंतर्गत 3 लाख रुपये प्रतिहेक्टर मदत, खचलेली किंवा बाधित विहीरी करीता 30 हजार रुपये, तसेच तातडीच्या मदतीसाठी 1500 कोटी रुपये डीपीडीसीत राखीव ठेवण्यात आले आहे.
दुष्काळी सवलती लागू : जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, वीज बिल माफी आधीच, शाळा, कॉलेज परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामात शिथिलता, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे या सवलती लागू झाल्या आहेत.