शहीद बालाजी रायपूरकर आयटीआय मध्ये पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती

शहीद बालाजी रायपूरकर आयटीआय मध्ये पंडीत दिनदयाल उपाध्याय जयंती

चंद्रपूर, दि. 30 : शहीद बालाजी रायपूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिमूर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ‘एकात्म मानवतावाद, अंत्योदय विचारक, तत्त्वज्ञ आणि प्रेरणास्त्रोत’ यावर प्रामुख्याने मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या प्राचार्य प्रणाली दहाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल मेहेर, गट निदेशिका पी.आर. बलकी, डॉ. श्यामजी हटवादे उपस्थित होते.

संस्थेच्या प्राचार्य प्रणाली दहाटे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाचे महत्त्व समजावून त्यांना शॉर्ट कोर्स बद्दल मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मेहेर यांनी सुध्दा प्रशिक्षणार्थांना औद्योगिक शेत्रात होणारी क्रांती व त्यासाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ याबाबत अवगत केले. संस्थेच्या गटनिदेशिका बलकी यांनी संस्थेत सुरू होणा-या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाबद्दल माहिती देवून औद्योगिक क्षेत्रात त्याचा होणारा उपयोग व स्वयंमरोजगारास उपयोगी येणारे कौशल्य समजावून सांगितले. तसेच शिल्प निदेशक सागर दरवळकर यांनी माहिती अधिकार यावर प्रशिक्षणार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी माहिती अधिकार दिवससुध्दा साजरा करण्यात आला. डॉ. हटवादे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जीवनचरीत्रावर मोलाचे मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाचे संचालन संस्थेतील शिल्प निदेशक राहूल भेंडारकर यांनी तर आभार शिल्प निदेशक अमोल पावडे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.