महावितरणच्या महिला संघाला 47 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक; दुहेरीतही सुवर्ण / पुरुष संघाने केली कांस्यपदकाची कमाई

महावितरणच्या महिला संघाला 47 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक; दुहेरीतही सुवर्ण

पुरुष संघाने केली कांस्यपदकाची कमाई

नागपूर, दिनांक 27 सप्टेंबर 2025: अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या 47 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन 2025 च्या स्पर्धेत महावितरणच्या महिला संघाने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले तर पुरुष संघ कांस्यपदकाचे विजेते ठरले. यासह महिला खेळाडूंनी दुहेरीत सुवर्ण, एकेरीमध्ये रौप्यपदक जिंकत राष्ट्रीय स्पर्धेत वर्चस्व गाजवले. या सर्व खेळाडूंचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले आहे.

हिसार (हरियाणा) येथे तीन दिवसीय 47 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा शुक्रवारी (दि. 26) समारोप झाला. देशभरातली विविध वीज कंपन्यांचे संघ या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. महावितरणच्या महिला संघाने स्पर्धेत एकतर्फी वर्चस्व गाजवत अंतिम फेरीत गुजरात संघाला 2-0 ने पराभूत केले आणि सलग दुसऱ्या सुवर्णपदकाचा मान मिळवला. महावितरणच्या रितिका नायडू (कर्णधार), अनिता कुलकर्णी, चैत्रा पै, वैष्णवी गांगरकर, राणी पानसरे या खेळाडूंनी ही कामगिरी केली. तर चैत्रा पै व रितिका नायडू यांनी दुहेरी महिला गटात सुवर्णपदकाची तर अनिता कुलकर्णी यांनी एकेरी गटात रौप्यपदकाची कमाई केली.

महावितरणच्या पुरुष संघातील भरत वशिष्ठ (कर्णधार), पंकज पाठक, रोहन पाटील, सुरेश जाधव, दिपक नाईकवाडे यांनी चुरशीच्या सामन्यांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत धडक दिली व स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. महावितरणच्या महिला व पुरुष बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक म्हणून गुणवंत इप्पर तर संघ व्यवस्थापक म्हणून उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांनी काम पाहिले. महिला व पुरुष बॅडमिंटन संघातील खेळाडूंना पुणे येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे व पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांनी पुढाकार घेतला व संवाद साधून खेळाडूंचे मनोबल वाढवले.

महावितरणच्या महिला संघाची कर्णधार रितीका नायडू ही नागपूर परिमंडलांतर्गत असलेल्या महाल विभागात कार्यरत असून, संघाच्या या दैदिप्यमान कामगिरीसाठी मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता श्री अमित परांजपे, कार्यकारी अभियंता श्री समीर टेकाडे यांच्यासह अनेकांनी रितिका नायडू आणि संपुर्ण संघाचे अभिनंदन केले आहे.