‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी Ø कामासोबतच पदवी सुध्दा करता येईल पूर्ण

‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत जिल्हा परिषदमध्ये काम करण्याची संधी

Ø कामासोबतच पदवी सुध्दा करता येईल पूर्ण

चंद्रपूर, दि. 22 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु) यांच्या बी.बी.ए. (सर्व्हिस मॅनेजमेंट) या दूरस्थ पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय (SC / ST /VJ/NT) विद्यार्थ्यांकरीता सन 2022-23 पासून ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये पदवी शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. यंदाच्या वर्षापासून सुद्धा काही होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तीन वर्षासाठी ‘डिजिटल आणि एआय सुलभक’ म्हणून प्रशासकीय काम करण्याची संधी मिळणार आहे.

इग्नुच्या या कार्यानुभवावर आधारित तीन वर्षांची इंटर्नशिप गरजू पात्र विद्यार्थ्यांना देऊन, त्यांना केलेल्या कामाच्या बदल्यात विद्यावेतन देणारी ‘कमवा व शिका’ ही नाविन्यपूर्ण योजना यंदाच्या वित्तीय वर्षापासून पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्हा परिषदेतर्फे राबविली जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी केलेल्या कामापोटी प्रत्येक महिन्यासाठी पहिल्या वर्षी 8 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 9 हजार रुपये आणि शेवटच्या वर्षासाठी 10 हजार रुपये इतके विद्यावेतन अदा केले जाईल. सदर योजनेमध्ये सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि तिसऱ्या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची बीबीए ही पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने कार्यानुभवाचे प्रमाणपत्र, असा विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील 18 ते 30 वयोगटातील नुकत्याच बारावी पास झालेल्या, संगणक आणि विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) टूल्स चा प्रभावी वापर करता येणाऱ्या गुणवंत व होतकरू मागासवर्गीय (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती /विमुक्त जाती / भटक्या जमाती) विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी केले आहे.

सदर योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 26 सप्टेंबर 2025 अशी असून त्यासाठी https://tinyurl.com/ondzpibba2025 ही ऑनलाईन लिंक चंद्रपूर जिल्हा परिषद यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.