आदिवासींची फसवणूक करणा-यांना सोडणार नाही – आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके Ø बनावट सातबारावर पीक कर्जाची उचल प्रकरण Ø कडक कारवाई करण्याचे यंत्रणेला निर्देश

आदिवासींची फसवणूक करणा-यांना सोडणार नाही – आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके

Ø बनावट सातबारावर पीक कर्जाची उचल प्रकरण

Ø कडक कारवाई करण्याचे यंत्रणेला निर्देश

चंद्रपूर, दिनांक 21 : जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी शेतमजुरांच्या नावे बनावट सातबारा तयार करून पीक कर्जाची उचल व फसवणूक करणा-यांना कदापी सोडणार नाही. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे, असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, जिवती, गडचांदूर या तालुक्यातील 32 किंवा त्यापेक्षा जास्त आदिवासी कोलाम शेतमजुरांच्या अज्ञानाचा फायदा घेत तसेच त्यांना सरकारी अनुदानाचे आमिष दाखवून आरोपी विनायक राठोड याने या शेतमजुरांकडून त्यांचे पासपोर्ट फोटो व आधारकार्ड गोळा केले. सरकारकडून अनुदान मिळण्याची नवीन योजना आली आहे. मी तुम्हाला योजनेचे पैसे मिळवुन देतो, असे सांगुन कोलाम आदिवासी शेतमजुरांच्या अज्ञानाचा व भोळेपणाचा फायदा घेतला. गोळा केलेल्या पासपोर्ट व आधारकार्डच्या आधारे बनावट सातबारा तयार केला. तसेच पीक कर्जासाठी आवश्यक असणारे इतर कागदपत्रेसुध्दा तयार केली. गडचांदूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत आदिवासी शेतमजुरांना बोलावून राठोड याने त्यांची स्वाक्षरी आणि अंगठे फाईलवर घेतले. या आधारावर राठोड याने प्रत्येक शेतमजुरांच्या नावे किमान 1 लक्ष 60 हजार ते 1 लक्ष 70 हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज मंजूर करून घेतले

मारोतीगुडा (ता. जिवती) येथील बालाजी सुरेश सिडाम यांना बँकेत बोलावून पीक कर्जाचे 1 लक्ष 60 हजार रुपये काढण्यास सांगून त्यापैकी केवळ 10 हजार रुपये सिडाम यांना दिले व उर्वरीत रक्कम स्वत:जवळ ठेवून घेतली. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कर्मचारी थकीत कर्जवसुलीकरीता सिडाम यांच्याकडे आले असता, आपण अशा प्रकारचे कोणतेही कर्ज घेतले नाही, असे त्यांनी सांगितले. बँकेत चौकशी केल्यावर त्यांना समजले की जुलै 2021 मध्ये विनायक राठोड याने आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारावर बनावट सातबारा तयार केला आणि पीक कर्जाची रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे आरोपी विनायक राठोड याने आजुबाजुच्या गावातील 32 किंवा त्यापेक्षा जास्त आदिवासी कोलाम शेतमजुरांच्या नावे बनावट सातबारा करून अंदाचे 50 ते 55 लक्ष रुपयांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी बालाजी सिडाम यांच्या तक्रारीवरून, विनायक राठोड विरुध्द 15 सप्टेंबर 2025 रोजी गडचांदूर पोलिस ठाण्यात कलम 420, 465, 468 आणि 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात आदिवासींच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करणा-यांविरुध्द कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.